
गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे आर्थिक गणित कोसळलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबात उच्च शिक्षणाला मिळणारे प्राधान्य कमी होत चालल्याची भीती मुंबईतील नामांकित कॉलेजच्या प्राचार्यांनी व्यक्त केली आहे. कोरोनामुळे कार्यालयांच्या ठिकाणी होणारी वेतनकपात, अनेकांच्या हातातून निसटलेले रोजगार यामुळे घराघरांतील शैक्षणिक बजेट कोसळले आहे. मुंबई, ठाण्यासारख्या शहरी भागात राहणारी मध्यमवर्गीय कुटुंबे घराचे भाडे भरायला पैसे नसल्याने त्यांच्या मूळ गावी परतली आहेत. याचा परिणाम म्हणजे दहावीचा निकाल भरघोस लागूनही यंदा अकरावी प्रवेशाची कटऑफ घसरली. तसेच अकरावीबरोबरच आयटीआय आणि प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांना येणाऱया प्रवेशअर्जांची संख्याही खालावली आहे.
यंदा दहावी, बारावीचा निकाल भरघोस लागूनही अकरावी आणि प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांना येणाऱया अर्जांची संख्या कमी आहे. आयटीआय प्रवेशाचीही तीच बोंब आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आयटीआयला येणारे अर्ज एक लाखाहून कमी आहेत. याविषयी बोलताना विलेपार्ले येथील साठय़े कॉलेजचे प्राचार्य डॉ. माधव राजवाडे यांनी सांगितले, मध्यमवर्गीय कुटुंबात शिक्षणाला असलेले प्राधान्य दुर्दैवाने कमी झाले आहे. अकरावीसाठी अर्ज करणार्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली यावरून हे आधीच स्पष्ट झाले आहे. पदवी प्रवेशातही हेच चित्र आहे. राज्य सरकाराने फीमध्ये 15 टक्के कपात केली आहे. मात्र याविषयी पालकांमध्येही फारशी जनजागृती झालेली दिसत नाही. आमच्या कॉलेजच्या वतीने आम्ही यासंदर्भात पालकांना माहिती देण्याचे काम करीत आहोत, जेणेकरून आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये.
कमी खर्च असलेल्या पर्यायांना पालकांची पसंती
सध्या अनेक मध्यमवर्गीय पालक खर्च कमी करावा लागेल असेच शिक्षणाचे पर्याय आपल्या पाल्यांसाठी निवडत असल्याचे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक हेमंत शिंदे यांनी सांगितले. सायन्स शाखेतून प्रवेश घेणाऱया विद्यार्थ्यांना कमी खर्चाद्वारे डॉक्टर आणि इंजिनीयरिंगशिवाय उपलब्ध असलेल्या अन्य अभ्यासक्रमांची ओळख करून देण्यासाठी शिक्षण विभागाने यंत्रणा उभारायला हवी, असेही शिंदे यांनी सांगितले. पश्चिम उपनगरातील एका विद्यार्थिनीला दहावीच्या परीक्षेत 94 टक्के गुण मिळाले आहेत. जेईईची तयारी करायची होती. मात्र मुंबईतील खासगी कोचिंगच्या फीचे 10 लाखांपर्यंत असलेले पॅकेज पाहता या विद्यार्थिनीने एमएच सीईटी देण्याचा निर्णय घेतला आहे. दहावीत 97 टक्के गुण मिळविलेल्या दुसऱया एका विद्यार्थ्याचीही हीच कहाणी आहे. त्याच्या मोठय़ा भावाला अनेक प्रयत्नानंतरही ‘नीट’ क्रॅक करता आली नाही म्हणून आता त्याच्या पालकांनी दुसऱया मुलाला कॉमर्सला प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. आज जाहीर झालेल्या पहिल्या गुणवत्ता यादीत या मुलाने एनएम कॉलेजला प्रवेशही घेतला आहे.





























































