अकरावी प्रवेश – 15 जुलैपासून विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी

अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेला सुरूवात झाली असून एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसह अन्य बोर्डाची दहावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी 15 जुलैपासून प्रवेशाच्या वेबसाइटवर ऑनलाईन नोंदणी करू शकतात. तसेच प्रवेश अर्जातील भाग 1 देखील भरू शकतात. एसएससी बोर्डाचा निकाल जाहीर होईपर्यंत विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग भरता येईल. विद्यार्थ्यांनी पालकांच्या देखरेखीखाली तसेच शाळेतून मिळणाऱया सूचनेनुसार अर्ज भरावा, असे मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी सांगितले आहे.

ऑफलाईन प्रवेश अमान्य
मुंबई महापालिका क्षेत्रातील अकरावीचे सर्व प्रवेश ऑनलाईन पद्धतीनेच होणार असून मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक आणि ज्युनियर काँलेजनी ऑनलाईन प्रक्रियेत सहभागी होणे बंधनकारक आहे. तसेच विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने प्रवेश दिल्यास त्या विद्यार्थ्यांचा प्रवेश ग्राह्य धरला जाणार नाही, असेही अहिरे यांनी स्पष्ट केले आहे.

अकरावी ऑनलाईन प्रवेशाची वेबसाइट
http://mumbai.11thadmission.org.in

कोटय़ातून अकरावी प्रवेश घेणाऱया विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी अनिवार्य
कोट्याद्वारे अकरावीत प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांस ऑनलाइन प्रवेशाच्या वेबसाइटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. यंदा एसईबीसीचे आरक्षण 12 टक्के तर दिव्यांग कोटा 4 टक्के करण्यात आला आहे. तसेच सालाबादप्रमाणे इनहाऊस कोटा 10 टक्के, व्यवस्थापन 5 टक्के आणि अल्पसंख्याक कोटा 50 टक्के आहे.

प्रवेश प्रक्रिया सूचना
– एसएससी बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेश अर्जाचा भाग 2 म्हणजेच ऑप्शन फॉर्म भरता येणार.
– ऑनलाईन नोंदणी करतानाच विद्यार्थ्यांना लॉग इन आयडी व पासवर्ड मिळणार.
– प्रवेशाची माहिती पुस्तिका ही ऑनलाईन. प्रत प्रवेशाच्या वेबसाइटवर तसेच मोबाईल ऍपमध्ये असेल.
– नोंदणी सुरू झाल्यानंतर शाळा, कॉलेजमध्ये गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यात यावी.
– मुंबईबाहेरील विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याविषयी मार्गदर्शन केंद्रावर माहिती मिळेल. मार्गदर्शन केंद्राविषयीची माहिती माहितीपुस्तिकेत देण्यात आली आहे.
– शाळा स्तरावर विद्यार्थ्यांचा अर्ज ऍप्रूव्ह करण्याची प्रक्रियादेखील ऑनलाईन होणार.
– प्रवेशप्रक्रिया फी ऑनलाइन भरावी लागणार.
– प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्यफेरी रद्द.

आपली प्रतिक्रिया द्या