हृदयद्रावक घटना, मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने संपूर्ण कुटुंबाची सामूहिक आत्महत्या

3260

गडचिरोलीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलीने पळून जावून दुसऱ्या जातीच्या मुलाशी लग्न केल्याने संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याचा मन सुन्न करणारा प्रकार समोर आला आहे. रवींद्र नागोराव वरगंटीवार (50), वैशाली रवींद्र वरगंटीवार (43), साईराम रवींद्र वरगंटीवार (19) अशी मृतकांची नावे आहेत. गडचिरोली शहरातील विवेकानंदनगर भागामध्ये ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वरगंटीवार यांच्या मुलीचे दुसऱ्या जातीच्या मुलाशी प्रेम होते. मुलीने आपले प्रेम विवाह करून देण्यासाठी वडिलांकडे मागणी केली. मात्र घरच्यांना त्यांचा प्रेमविवाह मान्य नसल्याने त्यांनी नकार दिला. तेव्हा मुलीने आपण प्रेम विवाहच करणार असल्याचे ठामपणे सांगत शनिवारी घरून निघून गेली. रविवारी तीर्थक्षेत्र मार्कंडादेव मंदिरात तिने विवाह केला.

मुलीने पळून जावून लग्न केल्याने कुटुंबीय प्रचंड अस्वस्थ झाले. अनेकांनी त्यांची समजूत काढल्यानंतरही ते प्रचंड अस्वस्थ होते. याच अस्वस्थतेतून तिघांनीही सोमवारी सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आणि दुपारच्या सुमारास विवेकानंदनगर परिसरातील मोकळ्या जागेत असलेल्या विहिरीवर पोहोचले. तेथे आपल्याजवळील सामान विहिरीच्या काठावर काढून ठेवत तिघांनीही एकत्र उडी घेतली.

दरम्यान, घटनेची माहिती शहरात पसरतात अनेक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. यामुळे शहरामध्ये खळबळ उडाली आहे. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तिघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले आहेत. पुढील तपास गडचिरोली पोलीस करत आहेत. या ह्रदयद्रावक घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या