
विदर्भात वर्धा व गडचिरोली जिह्यात दारूबंदी आहे तरीही अवैध मार्गाने दारूची विक्री सुरू असते. याविरोधात अतिदुर्गम मन्नेराजाराम गावाने दारूबंदीच्या दिशेने ठोस पाऊल टाकत ग्रामसभेत महत्त्वाचा ठराव केला आहे. यात गावाकऱयांना अवैध दारू विक्रेत्याच्या अंत्यसंस्कारातही सहभागी होऊ नका असे आवाहन करण्यात आल्यामुळे मद्य विक्रेत्यांमध्ये खळबळ माजली आहे.
मुक्तीपथ गाव संघटना, ग्रामपंचायत, पेसा ग्रामसभा, पोलीस विभाग, गोटुल समिती, मुक्तीपथ-शक्तीपथ महिला संघटना, युवक संघटना तसेच शेजारच्या येचली आणि बामनपल्ली गावातील पदाधिकारी यांच्या संयुक्त पुढाकारातून हा ठराव घेण्यात आला आहे. यामध्ये दारू विक्रीवर पूर्ण बंदी घालण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला असून विक्री करणाऱयांवर 20 हजार रुपयांचा दंड आकारण्याचे ठरविण्यात आले आहे. दारूबंदीच्या अंमलबजावणीसाठी गावकऱयांनी जनजागृती रॅलीचे आयोजन केले. दारू विक्रेत्यांना शिक्षा देण्याऐवजी गांधीगिरीचा मार्ग स्वीकारत पुष्पगुच्छ देऊन समज देण्यात आली. यापुढे दारू विक्री सुरू राहिल्यास कठोर कारवाई केली जाणार असा इशारा देण्यात आला.
महिला व युवकांचा पुढाकार
दारूबंदी मोहिमेत महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.युवक संघटनांनीदेखील या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला. युवकांनी आपल्या भविष्यासाठी दारूविरहित वातावरणाची गरज अधोरेखित केली. ग्रामसभेच्या निर्णयाला न्याय्य मानून दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यास प्रशासनही तत्पर राहील, असे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे गावकऱयांचा आत्मविश्वास वाढला असून या मोहिमेला बळकटी मिळाली आहे.





























































