आठ लाख रुपयांचे बक्षीस शीरावर असलेला जहाल नक्षलवादी सोमा ठार

775

आठ लाख रुपयांचे बक्षीस शीरावर असलेला जहाल नक्षलवादी पेरमिली दलमचा कमांडर कोटे अभिलाष उर्फ चंदर सोमा शुक्रवारी पोलिस चकमकीत ठार झाला. शनिवारी त्याची ओळख पटली असून त्यांच्या जवळून नक्षली साहित्य जप्त करण्यात आले आहे.

गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील हेडरी उपविभाग अंतर्गत मौजा येलदमडी जंगल परिसरात शुक्रवारी सायंकाळी सी-60 कमांडोंसोबत नक्षलवाद्यांची चकमक उडाली होती. त्यानंतर घेतलेल्या शोध मोहिमेत एका मृतदेहासह एक बंदूक, दोन प्रेशर कुकर, वायर बंडल, दोन वॉकीटॉकी, कॅमेरा फ्लॅश, 20 पिट्टू आणि इतर नक्षल साहित्य पोलीस पथकाच्या हाती लागले होते. शनिवारी मृत नक्षलवाद्याची ओळख पटविण्यात यश आले.

मृत सोमा उर्फ शंकर हा तेलंगणा राज्यातील कारापल्ली (जि. मुलुगू) येथील रहिवासी होता. तो 2008-09 मध्ये नक्षल दलममध्ये भरती झाला होता. 2012-13 पासून गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असताना 2018-19 मध्ये त्याच्याकडे पेरमिली दलम कमांडर म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. त्याच्या मृत्यूमुळे नक्षल दलमला हादरा बसला आहे.

विविध ठाण्यात 15 गुन्ह्यांची नोंद

दलम कमांडर सोमा उर्फ शंकर याच्यावर गडचिरोली पोलीस दलातील अनेक ठाण्यांमध्ये 15 गुन्हे दाखल आहेत. त्यात खुनाचे 5 गुन्हे, चकमकीचे 5 गुन्हे, जाळपोळीचे 3, दरोड्याचा 1 आणि इतर 1 अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे त्याच्यावर 8 लाखांचे बक्षीस ठेवले होते. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी या जहाल नक्षलवाद्यास कंठस्नान घालणाऱ्या सी-60 कमांडोंच्या कामगिरीचे कौतुक करून त्यांना रोख पारितोषिक जाहीर केले.

आपली प्रतिक्रिया द्या