सोनपावलांनी आज गौरींचे आगमन

96

सामना ऑनलाईन, मुंबई

गौराई आली सोन्याच्या पावलांनी… गौराई आली माणिक मोतींच्या पावलांनी… असे म्हणत शनिवारी लाडक्या गौराईंचे आगमन होणार आहे. तीन दिवसांच्या माहेरवाशीण गौराईचे स्वागत करण्यासाठी सर्वत्र उत्साह दिसून येत आहे. गौरीपूजनाच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी महिलांची गर्दी दिसून येत आहे.

ज्येष्ठा गौरी अनुराधा नक्षत्रात येतात. ज्येष्ठा नक्षत्रात ज्येष्ठागौरींचे पूजन केले जाते आणि मूळ नक्षत्रात त्यांचे विसर्जन केले जाते. या वर्षी शनिवारी संपूर्ण दिवसभर अनुराधा नक्षत्र आहे. त्यामुळे या दिवशी संपूर्ण दिवस कधीही गौरी आणाव्यात. रविवारी संपूर्ण दिवसभर ज्येष्ठा नक्षत्र आहे. त्यामुळे कधीही ज्येष्ठा गौरी पूजन करावे, असे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

फुले महागली

गौराईच्या सजावटीसाठी आणि पूजेसाठी मोठय़ा प्रमाणात फुलांचा वापर केला जातो. मोगऱ्याचे 4 गजरे 100 रुपयांना, शेवंतीची वेणी 70 रुपये, मोगऱ्याची वेणी 70 रुपये, झेंडूची वेणी 25 रुपये, गुलाबाची जुडी 70 ते 100 रुपये, जास्वंदीचे एक फूल 5 रुपये याप्रमाणे आज बाजारात फुलांचे दर आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या