प्रतिपावनखिंड किल्ला परिसरात रस्त्यांची दुरवस्था, नागरिकांसह पर्यटकांत नाराजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गगनबावडा तालुका निसर्गसंपन्नतेने नटलेला असून, या भूमीत ऐतिहासिक दुवे सापडतात. गगनबावडा व राधानगरी या दोन्ही तालुक्यांच्या मधला दुवा असणाऱया बावेली, राई या गावांना ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे. या परिसरातील प्रतिपावनखिंड परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने या परिसरात पर्यटकांना भ्रमंती करण्यासाठी प्रचंड अडचणी येत आहेत. त्यामुळे या परिसरात पक्क्या रस्त्यांची गरज असून, शासनाने लवकरात लवकर पक्के रस्ते बांधावेत, अशी मागणी नागरिकांसह पर्यटक करीत आहेत.

मराठय़ांच्या इतिहासातील दुर्लक्षित शिलेदार बाबाजी काटे यांच्या रक्तरंजित इतिहासाने झालेली ‘प्रति पावनखिंड’ म्हणजे गगनबावडा तालुक्यातील बावेली पैकी काटेवाडी परिसर. बाबाजी काटे यांच्या शौर्याचा इतिहास अत्यंत प्रेरणादायी असून, या दुर्लक्षित स्थळाचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे. या पर्यटनस्थळाला पदभ्रमंती व भेट देणाऱया हौशी पर्यटकांची सतत वर्दळ असते.

या परिसरात प्रसिद्ध असा लक्ष्मी धबधबा पाहण्यासाठी लोक येतात. पण या ठिकाणी जाण्यासाठी चांगला मार्ग नसल्यामुळे पर्यटकांना येथे जाण्यासाठी अडचणी येतात. तसेच या परिसरातील राई येथे पुरातन लक्ष्मी देवीचे मंदिर असून, ते सध्या दुर्लक्षित आहे. हे सर्व अनुभवण्यास पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु बाजारीचा फाटा-बावेली धनगरवाडा-राई या दहा किमी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, प्रचंड दुरवस्था झाली आहे.

रस्ता होऊन 20 वर्षे झाली असून, पुन्हा यावर डांबरीकरण झाले नाही. सध्या या रस्त्यावरील डांबराचा थर उडून गेल्याने मोठय़ा प्रमाणात जागोजागी खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात तर या मार्गावरून जाणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. त्यामुळे सदर रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. तसेच दुचाकीचे अनेक अपघात घडले आहेत. अशा देदिप्यमान इतिहासाचा साक्षीदार असणाऱया या ऐतिहासिक आणि भौगोलिक स्थळांचा विकास करण्यासाठी पक्क्या रस्त्याची आवश्यकता आहे.

या ऐतिहासिक वारसा जोपासणाऱया स्थळांचा विकास झाला तर स्थनिक पातळीवर रोजगारनिर्मिती होईल. पर्यटन क्षेत्राच्या विकासाबरोबरच स्थानिकांना व्यवसाय मिळेल. भविष्यात तालुक्याची ओळख ‘पर्यटन हब’ म्हणून होईल. यासाठी शासनस्तरावर प्रयत्नांची गरज आहे.

– विकास मलगुंडे, सामाजिक कार्यकर्ते.