‘गंध फुलांचा गेला सांगून’ पुस्तकाचे आज प्रकाशन

150

सामना प्रतिनिधी । मुंबई

दिवंगत अभिनेत्री उमा भेंडे आणि त्यांचे पती प्रकाश भेंडे यांचे मराठी चित्रपटसृष्टीत कृष्णधवल जमान्यापासून मोठे योगदान आहे. त्यांच्या सहा दशकांतील यशस्वी वाटचालीचा आणि जीवनप्रवासातील आठवणींचा पट उलगडणारा ‘गंध फुलांचा गेला सांगून’ या पुस्तकाच्या रूपाने रसिकांना अनुभवता येणार आहे. उद्या ३१ मे रोजी म्हणजे उमा यांच्या जन्मदिनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे दुपारी ३ वाजता या पुस्तकाचे आणि ऑडिओ सीडीचे प्रकाशन होणार आहे.

गेल्या वर्षी २९ जुलै रोजी उमा यांचे निधन झाले. त्या दु:खातून सावरत प्रकाश भेंडे यांनी वयाच्या ७७ व्या वर्षी पुस्तकलेखनाचा ध्यास घेऊन ‘गंध फुलांचा गेला सांगून’ हे पुस्तक साकारले आहे. पुस्तक म्हणजे दोघांचा जीवनप्रवास आहे. दोघांचे खडतर बालपण, उमा यांना आईकडून मिळालेला कलेचा वारसा, त्यानंतर इंडस्ट्रीत काम मिळताना आलेले अनुभव, अडचणी, दोघांचे सहजीवन, त्यानंतर ‘प्रसाद चित्र’ या संस्थेच्या माध्यमातून निर्मितीत केलेले पदार्पण, आव्हानांचा सामना अशा अनेक गोष्टींचे संचित म्हणजे ‘गंध फुलांचा गेला सांगून’ हे पुस्तक आहे. या पुस्तकाचे आणि सीडीचे प्रकाशन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या