
मालवण शहर परिसरात सर्वत्र ‘अथर्वशीर्ष’ पठणाचे स्वर घुमत आहेत. भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूलने सलग सातव्या वर्षी हा उपक्रम राबविला आहे. पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे 13 गटांमधील 132 विद्यार्थी घरोघरी अथर्वशीर्ष पठण करीत असून भंडारी हायस्कुलने राबविलेल्या उपक्रमाचे मालवणात सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
मालवण येथील भंडारी हायस्कूल ही शैक्षणिक संस्था नेहमीच शिक्षणाबरोबरच सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणेश चतुर्थीचे औचित्य साधून या शाळेने अथर्वशीर्ष पठणाचा उपक्रम राबविला. अशा प्रकारच्या अथर्वशीर्ष पठणाने घराघरातील चैतन्यदायी वातावरणात भर पडल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत असून ही मुले खाजगी घरांबरोबरच सार्वजनिक गणेश मंडळानाही भेट देत अथर्वशीर्ष पठण करीत आहेत. या उपक्रमाचे सलग सातवे वर्ष असून या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. एस एस टिकम, संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर , संस्थेचे चेअरमन सुधीर हेरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका ए. ए. वाईरकर, पी.जी. मेस्त्री यांनी अथक परिश्रम घेतले.
भंडारी हायस्कुल चे विद्यार्थी गेले पाच दिवस मालवण शहरासह घुमडे, कातवड, देवबाग,तारकर्ली, वायरी, भूतनाथ, रेवंडी, कोळंब, खैदा, निव्हे यासह ग्रामीण भागात गटागटाने अथर्वशीर्ष पठणासाठी जात आहेत. एका गटाच्या विद्यार्थ्यांनी मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, यांच्या निवासस्थानी अथर्वशीर्ष पठण केले. यावेळी नगरसेवक यतीन खोत, मुख्याधिकारी जयंत जावडेकर हे उपस्थित होते या सर्वांनी मुलांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.























































