चिपळूण सार्वजनिक मंडळाचा गणेशोत्सव फक्त दिड दिवसांचा; गणेशमुर्तीही दोन फुटांची आणणार

385

कोरोनाच्या संकटामुळे यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा, तसेच गणेशमुर्तीची उंची चार फूटांपर्यत ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केले आहे. या आवाहनाला कोकणातून चांगला प्रतिसाद मिळात आहे. चिपळूण तालुक्यातील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, चिपळूणची गणेशोत्सव 2020 आयोजनाबाबत बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत गणेशोत्सवाचा कालावधी दिड दिवसाचा करण्यावर एकमत झाले. तसेच गणेशमुर्तीची उंची दीड ते दोन फूट ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

गणेशोत्सवाच्या काळात सुरक्षित अंतर राखून व शासनाचे सर्व नियम पाळून दिड दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी गणरायाची प्राणप्रतिष्ठा होईल, दुपारी महानैवेद्य दाखवला जाईल. रात्री आरती व मंत्रपुष्पांजली होईल. दुसऱ्या दिवशी म्हणजे ऋषी पंचमीच्या दिवशी सकाळी मंत्रौपचार पुजा व दुपारी महानैवेद्य व नंतर उत्तरपुजा होऊन सायंकाळी श्रींचे साधेपणाने विसर्जन होईल. श्रींची विसर्जन मिरवणूक होणार नाही. यावर्षी फक्त पुजेची दिड-दोन फुटांची शाडूमातीची मुर्ती आणली जाणार आहे. गरजू विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. श्रावण महिन्यातील आरोग्य शिबिराबाबत आयोजनचा निर्णय घेण्यात येणार आहे. कोरोनाचे संकट टळल्यावर शासनाच्या आदेशानुसार उक्ताड येथील बालवाडी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. यावर्षी वर्गणी न घेण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. तरीसुद्धा काही भक्तगणांना मंडळाच्या बालवाडी, व्याख्यानमाला, शिष्यवृत्ती या सारख्या विविध उपक्रमांना आर्थिक सहकार्य करावयाचे असेल त्यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाने केले आहे. वरील सर्व निर्णय बैठकीला उपस्थित सदस्यांनी एकमताने घेऊन शासनाला कोरोनाच्या संकटात पूर्ण सहकार्य करण्याचे ठरविण्यात आले आहे, अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या