नगरमध्ये 14 गणेश मंडळांच्या मिरवणुकीला लागले 12 तास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…’ असा जयघोष करीत नगर शहरासह जिह्यात गणरायाला अतिशय भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील व त्यांच्या पत्नी मीनल पाटील यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. शहरातील 14 मंडळांची विसर्जन मिरवणूक 12 तास चालली.

नगर शहरासह जिह्यात गेल्या दहा दिवसांपासून मोठय़ा उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. शहरातील माळीवाडा भागातील 12 मानाचे, तर एकूण 14 मंडळे या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. अनेक मंडळांच्या पुढे पारंपरिक वाद्यांचा समावेश होता. विशाल गणपतीची आरती झाल्यानंतर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. रस्त्यांवर रांगोळ्यांच्या पायघडय़ा घालण्यात आल्या. यावेळी मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या हस्ते मानाच्या गणपतीची आरती करण्यात आली. मानाच्या विशाल गणपतीच्या समोर गंधर्व ढोल पथकासह पारंपरिक पद्धतीने सनई-चौघडय़ाचाही सहभाग होता. तलवारबाजीसह विविध प्रकारच्या मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकेही यावेळी सादर करण्यात आली. कापड बाजार चौकामध्ये आदर्श व्यापारी मित्रमंडळाचे अध्यक्ष संजय चोपडा यांच्या हस्ते मानाच्या गणपतीची विधिवत पूजा करण्यात आली. नेता सुभाष चौक मंडळाचे अध्यक्ष युवासेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांच्या हस्ते आरती करण्यात आली. दिल्लीगेट येथे दिल्लीगेट तरुण मंडळाचे अध्यक्ष, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी मानाच्या गणपतीची आरती केली.

गणपती मंडळांमध्ये खूप अंतर पडत असल्याने मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळाला. मानाचा पहिला गणपती नवी पेठेत असताना दुसरा गणपती हा थेट अर्बन बँकेजवळ, तर बाकीचे सर्व गणपती कापड बाजारातच रेंगाळले होते. अखेर बाराच्या ठोक्याला मिरवणूक थांबविण्यात आली. अनेक मंडळे कापड बाजाराच्या आसपासच असल्याने नेता सुभाष चौक, नवी पेठेत थांबलेल्या नागरिकांना या मंडळांच्या मिरवणुका पाहायला मिळाल्या नाहीत. पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. मात्र, एकाही मंडळाला पोलिसांनी पुढे नेण्यास न सांगितल्याने मिरवणूक रेंगाळली होती.

सावेडी उपनगरातील 12 मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत भाग घेतला होता. पारंपरिक वाद्यांसह डीजेच्या तालावर गणरायाला निरोप देण्यात आला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. नगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, पोलीस उपअधीक्षक सौरभ अग्रवाल, शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे, उपाधीक्षक अजित पाटील, पोलीस निरीक्षक अनिल कटके, पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱयांनी बंदोबस्त तैनात केला होता.

तीन मंडळांचे सिडीप्लेअर जप्त

विसर्जन मिरवणुकीच्या वेळी सिडीला दिलेल्या परवानगीचे उल्लंघन करणाऱया तीन मंडळांचे सिडीप्लेअर पोलिसांकडून जप्त करण्यात आले. मानाचा गणपती व इतर गणपती विसर्जनासाठी दिल्ली गेटकडून बाहेर पडत असतानाच या ठिकाणची वाहतूक वळवण्याची आवश्यकता होती. मात्र, तसे न झाल्यामुळे संध्याकाळी पहिला मानाचा गणपती बाहेर पडल्यानंतर या ठिकाणी प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. रुग्णवाहिकेलाही मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागली.

शिवसेनेच्या गणपतीला मान

विसर्जन मिरवणुकीत शिंदे गटाचा गणपती हा शिवसेनेच्या गणपतीच्या पुढे नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. त्यामुळे काही काळ मिरवणूक थांबविण्यात आली. पोलीस प्रशासनाने वेळेत हस्तक्षेप करून परंपरेप्रमाणे शिवसेनेचा गणपती पुढे जाईल व नंतर शिंदे गटाचा गणपती जाईल, असा निर्णय दिला. त्यानंतर हा वाद मिटला आणि मिरवणूक पुन्हा सुरू झाली. शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या नीलकमल मित्रमंडळ यांच्या वतीने विसर्जन मिरवणुकीच्या वेळी गणपतीला आकर्षक अशी सजावट करत असतानाच या ठिकाणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे फ्लेक्स सर्वांना आकर्षित करून घेत होते. उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांच्या दिल्ली गेट तरुण मंडळामध्ये महिला व मुलींनी मोठय़ा उत्साहात डीजेच्या ठेक्यावर ताल धरला होता.