
पर्यावरणपूरक गणेशमूर्ती एक आगळावेगळा प्रयोग करत टिश्यू पेपरसह चवळी, तूरडाळ, मसूरडाळ अशा कडधान्यांनी साकीनाक्याचा 50 किलो महाराजाधीराज साकारण्यात आला आहे. साकीनाक्यातील परेरावाडी येथील ओम श्री सिद्धिविनायक मित्र मंडळाने साकारलेली ही मूर्ती पाहाण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.
साकीनाक्याच्या महाराजाधीराजाची मूर्ती ही इतर सार्वजनिक मंडळांप्रमाणे सुरुवातीला प्लॉस्टर ऑफ पॅरिसमध्ये बनवून येत होती. मात्र, विसर्जनानंतर दुसर्या दिवशी विघटन न झाल्यामुळे चौपाट्यांवर मूर्तींची विटंबना पाहावली नाही आणि त्यानंतर पूर्यावणपूरक मूर्ती आणण्याकडे मंडळाची वाटचाल सुरू झाली. पवई तलावात मूर्तीचे विसर्जन हेत असल्यामुळे जलचरांनाही त्याचा काही त्रास होत नाही, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष बंटी खानविलकर यांनी दिली.
ही गणेशमूर्ती साकारण्यासाठी तब्बल 6 महिने लागले असून याची तयारी दिवाळीनंतर सुरू झाली. मूर्तीली टिश्यू पेपर बेस असल्यामुळे आणि ते खूपच पातळ असल्यामुळे तो पुन्हा सुकवून त्याला आकार देणे, त्यावर कडधान्य लावणे यासाठी वेळ लागतो. पावसाळा येण्याआधी तो कारखान्यात सुकवून तयार ठेवला जातो. कारण पावसाळ्यात टिश्यू सुकणे कठीण असते, अशी माहिती मूर्तीकार राजेश मयेकर यांनी दिली.


























































