गेल्या दहा वर्षांत गणेशोत्सव साजरा करताना शासनाचे नियम व अटी, कायदा पाळणाऱ्या मंडळांना या वर्षी सलग पाच वर्षांसाठी परवानगी देणार असल्याचे पालिकेने जाहीर केले असले तरी सवलतीच्या नावाखाली उत्सवासाठी मंडप परवान्याच्या नियम, अटी-शर्ती जैसे थेच असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. सवलत जाहीर केली असली तरी मंडळांना पोलीस, पालिकेच्या ना हरकत प्रमाणपत्रांसाठी हेलपाटे मारावेच लागणार आहेत. त्यामुळे पालिकेने तातडीने याची दखल घेऊन शासनाच्या गतवर्षीच्या निर्णयाशी अधिन राहून कोणत्याही अटी-शर्ती न घालता सर्वच मंडळांना सलग तीन ते पाच वर्षांसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केली आहे.
मुंबई महानगरपालिकेने या वर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये मंडप उभारणीसाठी केवळ 100 रुपये नाममात्र शुल्क आकारणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षांत कायद्याचे पालन करून उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना मंडपासाठी सलग पाच वर्षांसाठी एकदाच परवानगी घ्यावी लागेल अशी सवलत जाहीर करण्यात आली आहे. याबाबत मंडळांना स्वयंघोषित ऑफिडेविट द्यावे लागणार आहे. मात्र मार्च 2020 मध्ये कोरोना काळात मंडळांवर उत्सव साजरा करताना अनेक निर्बंध होते. याचा फटका मंडळांना बसणार असल्याचे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी सांगितले आहे. शिवाय इतर अटींमुळे सलग परवानगीचा फायदा होणार नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. याबाबत त्यांनी पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगरणी यांना निवेदनही दिले आहे.
…मग नियमित परवानगीत फरक काय?
पालिकेने पाच वर्षे मंडप परवान्याची घोषणा केली असली तरी जाचक अटींमुळे बहुतांशी मंडळे सलग परवान्यापासून वंचित राहणार आहेत. पाच वर्षांसाठी सलग परवानगी मिळाल्यानंतरही प्रत्येक वर्षी पोलीस व वाहतूक विभागाची परवानगीची अटसुद्धा घातली आहे.
यामुळे दरवर्षी गणेश मंडळांना मंडपासाठी पालिका, पोलीस वाहतूक आदी ऑथरिटीकडे हेलपाटे घालावे लागणार आहेत. मग पालिका जी सूट देत आहे त्यात व नियमित परवानगी यात फरक काय, असा सवालही समन्वय समितीने उपस्थित केला आहे.
या प्रश्नांची उत्तरे द्या
- उत्कृष्ट काम करणाऱ्या मंडळांना सलग पाच वर्षांची मंडप परवानगी देण्यात येणार आहे. उत्कृष्ट काम म्हणजे नेमके काय?
- कृत्रिम तलावात गणेश विसर्जनाची जी अट घातलेली आहे त्यामुळे कृत्रिम तलावांची संख्या वाढवणार का?
- जी गणेश मंडळे दरवर्षी पारंपरिक पद्धतीने विसर्जन करतात त्याला आपणाकडून बंदी घालणार का?