भाजपने परवानगी दिली तर शिंदेंचा टांगा पलटी करेन! गणेश नाईक यांनी दिला आवाज

एकनाथ शिंदे यांच्या आधी तीन वेळा मी या जिह्याचा पालकमंत्री होतो. त्यामुळे त्यांनी मला हलक्यात घेऊ नये. भाजपने जर परवानगी दिली तर एकनाथ शिंदे यांचा टांगा पलटी करून घोडे फक्त फरारच नाही तर बेपत्ता करेन, असा आवाज वनमंत्री गणेश नाईक यांनी दिला.

एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना नाईक यांनी आज थेट शिंदे यांचे नाव घेऊन तोफ डागली. एकनाथ शिंदे नेहमीच म्हणतात, मला हलक्यात घेऊ नका, नाहीतर टांगा पटली घोडे फरार. ते मात्र मला हलक्यात घेतात. कल्याण ग्रामीणमधील 14 गावे नवी मुंबई महापालिकेत घ्यावीत, हा प्रस्ताव सर्वप्रथम मी मांडला होता. ज्या अटी आणि शर्ती टाकण्यात आल्या होत्या, त्यानुसारच ही गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करणे आवश्यक होते. मात्र तसे काहीच घडले नाही. या 14 गावांचा प्रस्ताव मंजूर करताना मला विचारात न घेता हलक्यात घेतले गेले, असे नाईक म्हणाले.

तीन हजार कोटींचा घोटाळा

नवी मुंबई महापालिकेच्या महासभेची मुदत संपली त्यावेळी तीन हजार कोटींच्या ठेवी होत्या. मात्र प्रशासकाच्या कारभारात दोन हजार 200 कोटी रुपयांच्या ठेवी काढण्यात आल्या. सुमारे तीन हजार कोटींचा घोटाळा करून शिंदे गटातील माजी नगरसेवकांच्या प्रभागात निधीची उधळपट्टी करण्यात आली. एका एका प्रभागात शंभर-शंभर कोटींची कामे काढली. या कामांची चौकशी आता निवडणूक झाल्यानंतर सुरू करण्यात येणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.