Ganeshotsav 2021 – अकरा देशांमध्ये पोहोचले पर्यावरणपूरक श्री गणेश

सिडकोतील मोरे गणपतीवाले यांची चौथी पिढी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारत आहे. 95 वर्षांपासून प्रबोधनाचा वसा त्यांनी जपला आहे. लाल आणि शाडू मातीत साकारलेल्या पर्यावरणपूरक रंगांनी रंगवलेल्या त्यांच्या मूर्ती 16 वर्षांपासून परदेशातील गणेशभक्तांच्या पसंतीला उतरल्या आहेत. यंदा 11 देशांमध्ये त्यांच्या 830 मूर्ती पोहोचल्या आहेत.

नाशिकमधील जुने मूर्तिकार म्हणून मोरे गणपतीवाले यांची ओळख आहे. सन 1926 मध्ये शंकरराव मोरे हे मूर्ती कलेकडे वळाले. ते पारंपरिक पद्धतीने मूर्ती घडवत. त्यांचे पुत्र शांताराम मोरे यांनी मूर्ती कलेत सुबकता, नावीन्यता आणली, तर नातू मयूर यांनी लाल मातीवर संशोधन करीत मूर्ती घडवण्यास सुरुवात केली. लाल आणि शाडू मातीपासून तयार केलेल्या मूर्ती 2004 पासून परदेशातील गणेशभक्तांपर्यंत पोहोचवण्यात येत आहेत. त्याची सुरुवात यू.के. येथून झाली. यावर्षी जर्मनी, सिंगापूर, मँचेस्टर, कतार अशा 11 देशांमध्ये 830 मूर्ती त्यांनी पाठवल्या आहेत. गेल्या 95 वर्षांपासून हे मूर्तिकार मातीच्या मूर्ती साकारत आहेत. तेव्हापासूनच पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी त्यांच्याकडून प्रबोधनही सुरू आहे.

पाच लाख नागरिक प्रशिक्षित

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. विविध कार्यशाळांच्या माध्यमातून मोरे यांनी गेल्या 25 वर्षामध्ये पाच लाख लोकांना मूर्ती कशी घडवावी याचे प्रशिक्षण दिले आहे. निसर्ग हाही आपल्या कुटुंबाचा भाग आहे, त्याच्या रक्षणासाठी प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे, असे आवाहन मयूर मोरे यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या