गणेशोत्सवासाठी मुंबई आणि एमएमआरडीए क्षेत्रातून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना अडचणी येऊ नयेत यासाठी कोकण रेल्वेने आणखी 20 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या गाड्या वाढवण्यासाठी शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे.
गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असते. मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडी होते. प्रत्येक वर्षी या वाहतूककोंडीमध्ये चाकरमानी तासन्तास अडकून पडतात. कोकण रेल्वेच्या सर्वच गाड्या पॅक असल्यामुळे अनेकांना प्रवास करता येत नाही. नाईलाजास्तव त्यांना मुंबई-गोवा महामार्ग किंवा अन्य मार्गाने कोकणात जावे लागते. ही हेळसांड थांबवण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सव कालावधीत कोकण रेल्वे मार्गावर जास्तीत जास्त प्रवासी गाड्या चालवाव्यात, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, महिला आघाडी जिल्हा संघटक वैशाली दरेकर- राणे, जिल्हा युवाधिकारी प्रतीक पाटील, उपजिल्हाप्रमुख विजय देसाई, विभागप्रमुख वैभव शिरोडकर यांनी केली होती.
शिवसेनेचे शिष्टमंडळ कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण रेल्वेच्या सीबीडी बेलापूर येथील मुख्यालयात मुख्य परिचालन व्यवस्थापक व्ही. सी. सिन्हा यांना भेटले होते. शिवसेनेने केलेल्या मागणीची कोकण रेल्वेने गंभीर दखल घेतली असून गणेशोत्सव काळात आणखी 20 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
मालवाहतूक पूर्णपणे बंद करा
संपूर्ण कोकणात गणेशोत्सव घराघरात साजरा केला जातो. या सणासाठी मुंबईतील चाकरमानी मोठ्या संख्येने आपल्या मूळगावी कोकणात जातात. मुंबईबरोबरच देशाच्या कानाकोपऱ्यात असलेले कोकणवासीयही आपल्या मूळगावी परततात. त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सव कालावधीत कोकण रेल्वे मार्गावर मालवाहतूक पूर्णपणे बंद ठेवावी आणि प्रवासी गाड्या चालवाव्यात, अशी मागणीही जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी केली आहे.