यंदा गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट; लाडक्या बाप्पाच्या दर्शनाला येणाऱ्या चाकरमान्यांच्या उत्साहावर विरजण

गणेशोत्सव तोंडावर आला की चाकरमान्यांची कोकणातील गावी येण्याची लगबग सुरु होते. एसटी किंवा कोकण रेल्वेच्या आरक्षणासाठी प्रयत्न सुरु होतात. गणपतीची आरास करण्यासाठी वेगवेगळ्या परंतू नाविन्यपूर्ण वस्तू खरेदी सुरु होते. गणेशोत्सवासाठी गावी जायचे या कल्पनेनेच चाकरमान्यांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारतो. मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर असलेले लॉकडाऊन आणि 14 दिवसांचे क्वारंनटाईन यामुळे यावर्षी पहिल्यांदाच चाकरमान्यांच्या उत्साहावर विरजण पडले आहे.

अनेक वर्षानंतर जगात पहिल्यांचा एका वेगळ्या महामारीने थैमान घातले आहे. कोविड 19 या नावाच्या वायरसने संपूर्ण जगच व्यापायला सुरवात केली आहे. सुसाट वेगाने पसरणाऱ्या हा विषाणू अवघ्या जगासाठी एक समस्या होऊन बसला आहे. मुंबईचे चाकरमानीही यातून सुटलेले नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी, रेल्वे ही सार्वजनिक वाहतुक व्यवस्था बंद ठेवाव्या लागल्या असल्याने सर्वसामान्यांना गाव गाठण्याचा पर्यायच खुंटला गेला आहे. चार पैसे गाठीला असलेले चाकरमानी भाड्याची वाहने घेऊन गाव गाठण्याच्या विचारात आहेत मात्र लॉकडाऊनमुळे कोकणच्या सिमा सिल करण्यात आल्याने भाड्याची वाहने घेऊन जायचे झाले तर जायचे कसे? हा प्रश्नही चाकरमान्यांसमोर आहे. समजा त्यातूनच चाकरमानी जिल्ह्यात आलेच तर नियमांनुसार त्यांना 14 दिवस क्वारंटाईन रहावे लागणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकण गाठण्याच्या विचारात असणारे चाकरमानी जावे की न जावे या द्विधा मनस्थितीत पडले आहेत. कोकणातील गणेशभक्तांची अवस्था फारशी वेगळी नाही.

गणेशोत्सवाची चाहूल लागताच कोकणात जाखडीच्या सरावाला सुरवात केली जाते. दिवसभर शेतात लावणी करून कितीही थकवा आलेला असला तरी येथील गणेशभक्त रात्री उशीरापर्यंत जाखडीचा सराव करत असल्याचे पहावयास मिळते. मात्र यावर्षी कोरोनामुळे एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे जाखडीचे सूर घुमलेले अद्याप तरी ऐकावयास मिळालेले नाहीत. गणरायांची सामुदायिक आरती देखील करण्यात येणार नसल्याचे ग्रामकृतीदलाकडून स्पष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे एकत्र येऊन आरतीही करता येणार नसल्याने गणेशभक्तांमध्ये कमालीचे नैराश्य पसरले आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा लोकमान्य टिळकांचा उद्देश हा सर्वांनी एकत्र येण्याचा होता. मात्र जगभरात परसरलेल्या कोविड 19 या विषाणुमुळे या उद्देशाला यंदा प्रथमच सुरुंग लागला गेला आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. देवाधिदेव गणराया हा विघ्नहर्ता आहे. त्याचे दुसरे नाव संकटमोचक असेही आहे. त्यामुळे जगावर आलेले कोरोनाचे संकट देखील गणराया दूर केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास गणेशभक्तांकडून व्यक्त केला जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या