पुणे शहरातील विविध भागात कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजलेले असतानाही पुणे पोलीस हाताची घडी तोंडावर बोट ठेवून चिडीचूप असल्याचे दिसून आले आहे. आता तर भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून सराईत हल्लेखोरांनी थेट सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कोयत्याने हल्ला केला आहे. हल्लेखोराने कोयता फेकून मारल्यामुळे एपीआय रत्नदीप गायकवाड गंभीररीत्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी दिली आहे.
निहालसिंग मन्नूसिंग टाक (18, रा. तुळजाभवानी वसाहत, हडपसर), राहुलसिंग ऊर्फ राहुल्या रवींद्रसिंग भोंड (19, रा. हडपसर) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. रत्नदीप गायकवाड असे गंभीररीत्या जखमी झालेल्या एपीआयचे नाव आहे.
ससाणेनगर रेल्वे गेटजवळ रविवारी दुपारी चारच्या सुमारास वाहन अपघातामुळे दोन दुचाकीस्वारांची भांडणे सुरू झाली होती. त्यावेळी आरोपी निहालसिंग मन्नूसिंग टाक आणि राहुलसिंग उैर्फ राहुल्या याच्या मदतीने दुसऱ्या दुचाकीस्वारासोबत वाद घालत होता. त्यावेळी त्याच्या हातात कोयता असल्यामुळे परिसरातून जाणारे सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. भांडणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करीत आरोपी निहाल सिंग टाक याच्या हातातून कोयता काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी टाकने त्याच्याकडील कोयता एपीआय गायकवाड यांच्या अंगावर फेकून मारला. त्यामुळे गायकवाड यांच्या कपाळावर गंभीर इजा झाल्याने ते जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर आरोपी निहालसिंह टाक, राहुलसिंग ऊर्फ राहुल्या व इतर दुचाकीवरून पसार झाले.
दोघेही आरोपी सराईत
हल्लेखोर निहालसिंग मन्नूसिंग टाक सराईत असून, त्याच्यावर तब्बल 20 घरपह्डीचे गुन्हे दाखल आहेत. वाहन चोरी, दरोडा, शस्त्र्ा बाळगण्याचे काही गुन्हेही त्याने केले आहेत. त्याचा साथीदार राहुलसिंग ऊर्फ राहुल्या रवींद्रसिंग भोंड याच्यावर विविध स्वरूपाचे 14 गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये दरोडा, वाहन चोरी, खुनाचा प्रयत्न, शस्त्र्ा बाळगण्याचे गुन्हे दाखल आहेत.
पोलीस आयुक्तांच्या दाव्याचे काय झाले?
नागरिकांसह महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायम दक्ष असल्याचे वेळोवेळी दावा करणारे पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचा दावा प्रत्यक्षात सत्यात उतरणार कधी, असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. सराईतांकडून थेट वर्दीवर हात उचलला जात असतानाही, पुणे पोलीस मात्र बघ्याची भूमिका का घेत आहेत, अशीही विचारणा केली जात आहे.