ऐन दिवाळीत मुंबईत कचराकोंडी; 20 टक्के गाड्या कमी केल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग

90

सामना प्रतिनिधी, मुंबई

मुंबईत ऐन दिवाळीत ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याने दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य परसले आहे. पालिका प्रशासनाने अचानक कचरा उचलणाऱ्या तब्बल 20 टक्के गाड्या कमी केल्यामुळेच ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप करीत आज शिवसेनेसह सर्वपक्षीयांनी प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले. पालिका प्रशासनाने दिवाळीत जर कचऱ्यावर तोडगा काढला नाही तर अधिकाऱ्यांच्या घरी कचरा आणून टाकू असा इशाराच सदस्यांनी यावेळी दिला.

मुंबईत सध्या दिवाळीची धामधूम सुरू असताना अनेक ठिकाणी दोन-तीन दिवस साचून राहणाऱ्या कचऱ्यामुळे रहिवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे सांगत ‘सपा’चे रईस शेख यांनी स्थायी समितीत हरकतीचा मुद्दा मांडून प्रशासनाचे लक्ष वेधले. कचरा उचलणाऱ्या 20 टक्के गाडय़ा कमी केल्यामुळेच ही स्थिती ओढवल्याचे ते म्हणाले. या प्रत्येक वाहनावर सरासरी सहा कर्मचारी होते. त्यांच्या नोकरी, रोजीरोटीबाबत प्रशासनाने काय उपाययोजना केल्या असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मुंबईत कचऱ्याचे अनेक ढीग दिसत असल्यामुळे प्रशासनाचा 2 हजार मेट्रिक टन कचरा कमी झाल्याचा दावा खोटा असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला. कचऱ्याच्या दुर्गंधी आणि घाणीमुळे विभागात डेंग्यूचे रुग्ण वाढल्याचे यावेळी राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव म्हणाल्या.

प्रशासन म्हणते, कचरा घटला
दरम्यान, पालिका प्रशासनाने कचरा व्यवस्थापनासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे मुंबईत दररोज जमा होणारा कचरा 9 हजार मेट्रिक टनांवरून कमी होऊन सात हजार मेट्रिक टन इतका कमी झाल्याचे उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी सांगितले. त्यामुळे काही ठिकाणी गाडय़ा कमी करण्यात आल्या आहेत. मात्र ज्या ज्या ठिकाणी कचरा उचलण्यासाठी गाड्यांची कमतरता असेल त्या त्या ठिकाणी गाड्या वाढवून देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

घनकचरा विभागाची श्वेतपत्रिका काढा!
घनकचरा विभागात अनागोंदी कारभार सुरू असल्यामुळे ‘भाजप’चे गटनेते मनोज कोटक, प्रभाकर शिंदे यांनी घनकचरा विभागाची श्वेतपत्रिका काढा अशी मागणी केली. या प्रश्नाबाबत आयुक्तांसोबत स्पेशल मीटिंग आयोजित करावी अशी मागणी सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी केली. या पार्श्वभूमीवर मुंबईत निर्माण झालेल्या कचऱयाच्या प्रश्नाची प्रशासनाने गंभीर दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी आणि लवकरात लवकर आयुक्तांसोबत या प्रश्नासाठी स्पेशल मीटिंग बोलावून हा प्रश्न कायमचा निकाली काढावा असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले.

रहिवाशांमध्ये संभ्रम
प्रत्येक वॉर्डमध्ये कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी राखीव भूखंड ठेवा अशी मागणी शिवसेनेच्या राजूल पटेल यांनी केली. पालिकेने सोसायट्यांना 100 किलोंवरील कचऱ्यावर प्रक्रिया करणे अनिवार्य केले असताना काही अधिकारी मनमानीपणे 100 किलोंपेक्षा कमी कचरा उचलणार नाही असे सांगत असल्यामुळे रहिवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे मंगेश सातमकर यांनी सांगितले. कचरा उचलणारे अनेक कामगार कामचुकारपणा करीत असल्याचे निदर्शनास येत असल्यामुळे ‘ए’ वॉर्डप्रमाणे अशा कामगारांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी रमेश कोरगावकर यांनी केली.

मुलुंड डंपिंग ग्राऊंड बंद झालेच नाही! स्थायी समितीमध्ये गौप्यस्फोट

मुंबईतील कचरा मोठय़ा प्रमाणात टाकण्यात येणारे मुलुंड डंपिंग ग्राऊंड 1 ऑक्टोबरपासून बंद होणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले होते. त्यामुळे या परिसरातील लोकांनी फटाके वाजवून या निर्णयाचे जाहीर स्वागत केले होते. मात्र अद्याप हे डंपिंग ग्राऊंड बंद झाले नसल्याचा गौप्यस्फोट भाजपचे सदस्य प्रभाकर शिंदे यांनी आज स्थायी समितीमध्ये केला. आजही या डंपिंग ग्राऊंडवर कचऱयाच्या गाडय़ा येतात आणि कचरा टाकत असतात असा आरोप शिंदे यांनी केला.

मुंबईतील कचरा साफ व्हावा म्हणून स्थायी समितीमध्ये प्रस्ताव मंजूर केले जातात पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही, असाही आरोप शिंदे यांनी केला. तसेच डंपिंग ग्राऊंड बंद करण्यासाठी ज्या कंत्राटदाराला कंत्राट देण्यात आले होते त्याने उशीर केल्याबद्दल त्याला दंड ठोठावण्याची मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली. मुलुंड येथे 1968 मध्ये सुरू झालेल्या डंपिंग ग्राऊंडवर सद्यस्थितीत तब्बल 1500 मेट्रिक टन कचरा टाकला जात होता, मात्र मुलुंड डंपिंग ग्राऊंडची क्षमता संपत आली आहे. त्यामुळे पुढील सहा वर्षांकरिता पालिकेने सुमारे 731 कोटी रुपये खर्च करून मुलुंड डंपिंग ग्राऊंडवरील कचरा उचलण्याचे कंत्राट फेब्रुवारी 2018 मध्ये दिले आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीसाठी रखडले
दरम्यान, मुलुंड डंपिंग ग्राऊंड अद्याप बंद झाले नसल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त विश्वास शंकरराव यांनी मान्य केले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीसाठी डंपिंग ग्राऊंड बंद करण्याची प्रक्रिया रखडली असल्याचे त्यांनी यावेळी मान्य केले. सध्या या ठिकाणी कचऱयाचे लहान कॉम्पॅक्टर आणि डेब्रिज टाकण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

summary- garbage issue creates in mumbai

आपली प्रतिक्रिया द्या