
टीम इंडियाला विश्वविजेतेपद मिळवून देणारे दिग्गज प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी अवघ्या सहा महिन्यांत पाकिस्तानच्या मर्यादित षटकांच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी आता तिथल्या ‘टॉक्सिक’ वातावरणाचा पर्दाफाश केला आहे. पाकिस्तान क्रिकेटमधील बाह्य हस्तक्षेप इतका टोकाचा आहे की, तिथे काम करणे अशक्य असल्याचे कर्स्टन यांनी म्हटले आहे. संघाच्या अंतर्गत बाबींमध्ये आणि खेळाडूंशी होणाऱ्या संवादात बाहेरील व्यक्तींचा सततचा अडथळा कोणत्याही प्रशिक्षकासाठी मोठे आव्हान ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
TalkSPORT Cricket शी बोलताना गॅरी कर्स्टन यांनी PCB ला फटकारलं आहे. पाकिस्तान क्रिकेटमध्ये पराभवाचे खापर नेहमी प्रशिक्षकांवर फोडले जाते आणि त्यांना पदावरून हटवणे हा बोर्डासाठी सर्वात सोपा मार्ग बनला असल्याची टीका कर्स्टन यांनी केली. पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्या कार्यकाळात सातत्यपूर्ण यश मिळवणे अशक्य असल्याचे सांगत, त्यांनी बोर्डाच्या ढिसाळ नियोजनावर थेट निशाणा साधला आहे. “जर प्रशिक्षकाला स्वातंत्र्यच मिळणार नसेल, तर त्यांची नियुक्ती तरी कशासाठी केली जाते?” असा बोचरा सवालही त्यांनी या निमित्ताने उपस्थित केला आहे.



























































