राजधानी दिल्लीपेक्षा डोंबिवली फास्ट, स्फोटके-गॅस चेंबरचे तीन वर्षांत 21 बळी

813

राजधानी दिल्लीत प्रदूषणाने कहर केल्याने संपूर्ण देशात चिंता व्यक्त केली जात असताना मुंबईला खेटून असलेली डोंबिवली मात्र स्फोटांचे शहर बनत चालली असल्याची चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. एमआयडीसीमधील घातक रासायनिक कारखान्यांमुळे येथील हवा आधीच प्रदूषित झाली आहे. त्याहून भयानक म्हणजे गेल्या तीन वर्षांत कारखान्यांमधील गॅस चेंबरला लागलेल्या आगी आणि स्फोटाने तब्बल 21 जणांचे बळी घेतले आहेत.

डोंबिवली  एमआयडीसीत पाच अतिधोकादायक कंपन्या आहेत. त्यांच्यासह शेकडो घातक रासायनिक कारखान्यांमधील प्रदूषणावर तोडगा निघत नसताना 26 मे 2016 मध्ये प्रोबेस कंपनीत मोठा स्फोट झाला आणि संपूर्ण डोंबिवली हादरली. या दुर्घटनेत कामगारांचा मृत्यू झाला. अनेक कामगार कायमचे जायबंदी झाले. त्यासोबतच परिसरातील अनेक इमारतींचेही नुकसान झाले. त्यानंतर जी स्फोटांची मालिका सुरू झाली ती अद्यापि थांबलेली नाही. गेल्या काही वर्षांतील स्फोटांच्या घटनांमुळे डोंबिवलीचा भोपाळ होण्याची भीती व्यक्त होत आहे.

– एमआयडीसीमध्ये एप्रिल 2016 ते एप्रिल 2019 या तीन वर्षांत आग, स्फोट व इतर अशा एकूण 18 दुर्घटना झाल्या. त्यात 21 व्यक्ती मृत्युमुखी पडल्या अशी धक्कादायक माहिती मिळाली आहे.

– या दुर्घटनांची सरासरी काढली तर वर्षाला सहा दुर्घटना घडल्या असून सरासरी सात बळी जात आहेत.

– दुर्घटनाग्रस्त कंपन्यांच्या विरोधात कारखाने अधिनियम 1948 व महाराष्ट्र कारखाने नियम 1963 अंतर्गत न्यायालयात खटले दाखल केले आहेत. मात्र त्यावर अद्यापि कोणताही निर्णय झाला नसल्याने नुकसानभरपाईची आशा धुसर झाली आहे. 

शिफारशी, सल्ले बासनात

प्रोबेस कंपनी स्फोटानंतर तज्ञांची चौकशी समिती नेमली गेली होती. त्यांनी वर्षभरानंतर 24 जुलै 2017 रोजी शासनास अहवाल सादर केला होता. त्यात अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी कडक शिफारशी व सल्ले दिले होते, परंतु सदर अहवाल औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, कल्याण यांच्याकडे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आल्याचे डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनचे पदाधिकारी राजू नलावडे यांनी सांगितले

आपली प्रतिक्रिया द्या