
‘वंदे मातरम’विषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणावर बोलताना काँग्रेसचे लोकसभेतील उपनेते गौरव गोगोई यांनी मोदी व भाजपवर जोरदार निशाणा साधला. मोदींनी गेल्या काही काळात पंडित जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेसच्या नावाचा किती वेळा जप केला याची आकडेवारीच गोगोई यांनी मांडली.
‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेत 14 वेळा, संविधान दिनावरील चर्चेत 10 वेळा, 2022च्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत 15 वेळा आणि 2020च्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत 20 वेळा अशा एकूण 59 वेळा नेहरूंचे आणि 76 वेळा काँग्रेसचे नाव घेतले आहे, असे गोगोई यांनी सांगितले. मात्र, मोदी आणि त्यांच्या यंत्रणेने कितीही आटापिटा केला तरी ते नेहरूंच्या योगदानावर एक डाग लावू शकणार नाहीत, असे गोगोई यांनी ठणकावले.
























































