‘त्या’ एका फोन कॉलनं आयुष्य बदललं; गौतम गंभीरने सांगितली टीम इंडियाचा हेड कोच बनण्यामागील Inside Story!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर हिंदुस्थानने न्यूझीलंडचा दारूण पराभव केला आणि टी-20 वर्ल्डकप जिंकला. यानंतर देशभरात एकच जल्लोष सुरू झाला. या विजयानंतर हिंदुस्थानच्या संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याच्यासह संघातील सर्वच खेळाडूंचे कौतुक होऊ लागले. मात्र हिंदुस्थानच्या या यशामध्ये मोलाचा वाटा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याचाही होता. त्याने संघातील स्टार कल्चर संपवले, तसेच तरुण खेळाडूंच्या पाठीमागे तो खंबीरपणे उभाही राहिला. मात्र हा काटेरी मुकुट डोक्यावर घेण्यास गौतम गंभीर तयार नव्हता. एका मुलाखतीमध्ये त्याने हा खुलासा केला असून टीम इंडियाचा हेड कोच बनण्यामागील इनसाईट स्टोरीही सांगितली.

जेव्हा मला टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनण्याची ऑफर मिळाली, तेव्हा मी त्यासाठी मानसिकदृष्ट्या अजिबात तयार नव्हतो, असे गंभीरने सांगितले. तो ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेच्या पॉडकास्टमध्ये बोलत होता. यावेळी त्याने आपल्याला ही ऑफर देण्यात आली त्यावेळी नक्की काय घडले हे देखील सांगितले.

गौतम गंभीरने सांगितले की, ही घटना आयपीएल दरम्यानची आहे. तेव्हा कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्सचा सामना होता. मी मुंबईतील ‘सेंट रेजिस’ हॉटेलमध्ये थांबलो होतो. त्या दिवशी सकाळी जय शहा यांचा फोन आला. त्यांनी थेट सांगितले की, मला तुम्हाला एक ऑफर द्यायची आहे आणि तुम्ही ती नाकारू शकत नाही.

जेव्हा मी विचारले की नक्की काय आहे, तेव्हा त्यांनी सांगितले की तुम्हाला हिंदुस्थानच्या पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक व्हावे लागेल. खरं सांगायचं तर, त्या क्षणी मी या जबाबदारीसाठी तयार नव्हतो, असेही गंभीरने यावेळी स्पष्ट केले.

मास्क, टोपी अन् अपर बर्थ; वर्ल्डकप जिंकल्यानंतर शिवम दुबेचा पत्नीसह ‘सयाजी एक्सप्रेस’ने प्रवास; टीसी आल्यावर काय घडलं?

टीम इंडियाची धुरा सांभाळण्यापूर्वी गौतम गंभीरकडे कोणत्याही संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून अनुभव नव्हता. तो केवळ आयपीएलमध्ये मेंटर म्हणून काम करत होता. अशा परिस्थितीत इतक्या मोठ्या पदासाठी आपल्यावर विश्वास दाखवल्याबद्दल गंभीरने जय शहा यांचे आभार मानले. हा निर्णय घेण्यापूर्वी गंभीरने पत्नी नताशा आणि कुटुंबाशीही चर्चा केली होती.

गौतम गंभीरने आपल्या कार्यकाळातील कठीण प्रसंगांचाही उल्लेख यावेळी केला. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर झालेल्या पराभवामुळे गंभीर प्रचंड निराश झाला होता. मुंबईत न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर मी विमानतळाकडे जात असताना पुन्हा जय शहा यांचा फोन आला. त्यांनी मला धीर दिला आणि म्हणाले की, खंबीर राहा, मी तुमच्या पाठीशी उभा आहे. अशा कठीण काळात मोजक्याच लोकांनी मला पाठिंबा दिला, त्यात ते अगस्थानी होते, असेही गंभीरने सांगितले.

क्रिकेट विश्वातील सर्वात ‘दुर्दैवी’ खेळाडू! 12 वेळा ICC स्पर्धा खेळूनही रिकामी झोळी, एकदाही ट्रॉफी उंचावता आली नाही