गेवराई नगर पालिकेच्या रस्ते गैरव्यवहाराची चौकशी करा; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सरकारच्या विविध योजनांमधून पालिकेला कोट्यवधी रुपयांचा विकास निधी प्राप्त झाला. मात्र, गेवराई नगर पालिकेतील भ्रष्ट कारभारामुळे त्याचा नागरिकांना लाभ मिळत नाही. शहरातील रस्त्यांच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार झाला असून त्याची पुराव्यानिशी आम्ही तक्रार देत आहोत. 2015 व त्यापूर्वीपासून आजपर्यंतच्या लेखा परिक्षण अहवालात पालिकेतील रस्त्यांच्या कामातील भ्रष्टाचाराबाबत गंभीर आक्षेप लेखा परिक्षकांनी नोंदविलेले आहेत. या सर्व प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी, असे प्रतिपादन नगरसेवक राधेशाम येवले यांनी केले. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

विकासाचा दांडोरा पिटणाऱ्या भाजपाच्या ताब्यात असलेल्या गेवराई नगरपरिषदे संदर्भात सतत भ्रष्टाचाराच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत.त्यामुळे गेवराई नगरपालिका भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकली आहे, असे येवले यांनी सांगितले. रस्ता अनुदान, वैशिष्ट्यपूर्ण योजना, अल्पसंख्यांक आयोग योजना, दलितोत्तर योजना, युडी-6 यासह शासनाच्या विविध योजनेतून गेवराई नगर पालिकेला कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला. रस्ता व नाली बांधकाम, डांबरीकरण, पथदिवे सुशोभीकरण यासह ओपन स्पेस संरक्षण भिंती अशी अनेक कामे करताना पालिकेतील पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांनी ठेकेदारांशी संगनमत करून कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याची टीका येवले यांनी केली. पालिकेतील गैरव्यवहाराबाबत त्यांनी पुराव्यासह शासनाकडे लेखी तक्रार दिली असून या बाबत चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.

रस्ते आणि बांधकामे यांच्या निविदा मंजुर करताना मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्या असून कामाच्या मोजमाप पुस्तिका अद्यावत ठेवलेल्या नाहीत. अनेक कंत्राटदारांना मंजुर किंमतीहून अधिकचे प्रदान करण्यात आले आहे. कामाच्या साहित्याची व दर्जाची कोणतीही तपासणी सक्षम प्राधिकरणातून केलेली नाही. निविदेतील मुदत संपलेली असताना आणि कंत्राटदाराने मुदतवाढ मागितलेली नसतानाही पालिकेने कोणतीही कारवाई न करता त्यांची देयके अदा केली आहेत. मुद्रांक शुल्क, कामगार निधी, आयकर आणि जीएसटी यांची कपात न करता कंत्राटदाराने देयके दिली आहेत. डांबरीकरणाच्या कामामध्ये डांबर वापराचा दर्जा आणि डांबर खरेदीचे रिफायनरीचे प्रमाणपत्र या बाबत खातरजमा न करता त्यांची देयके अदा केली आहेत. स्वतःला पारदर्शक समाजणाऱ्यांनी कामाचे वाटप करताना नगरसेवकांनी कंत्राटदाराचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हितसंबंधन नसल्याचा दाखल कंत्राटदाराकडून घेतला नाही. मुख्याधिकारी, लेखापाल, अभियंता यांनी कामाची तपासणी न करता, मोजमाप व साहित्याची पडताळणी न करता कामाची देयके अदा केली आहेत. अनेक कामे प्रत्यक्षात झालेली नाहीत तर अनेक कामांची दुबार देयके अदा केल्याचेही तक्रारीत कामाच्या नावासह नमुद करण्यात आले आहे. गेवराई नगर पालिकेतील रस्ते कामाच्या गैरव्यवहारा बाबत आयुक्त तथा संचालक, नगर पालिका प्रशासन, मुंबई, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि नगर विकास विभागाचे सचिव यांच्याकडे सदरच्या तक्रारी दाखल केलेल्या आहेत. लेखा परिक्षण अहवालात सुध्दा गंभीर आक्षेप नोंदविल्यामुळे गेवराई पालिकेतील गैरव्यवहार करणार्या विरुध्द कोणती कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.