
चोवीस तास वाहतुकीने गजबजलेला घोडबंदर रोड ‘डेंजर झोन’ बनला आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले असून डेब्रिजचे ढीग दिसत आहेत. त्यामुळे धुळीचे लोट निर्माण होत असल्याने वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या ‘धुळ’वडीमुळे प्रवासी व रहिवाशांचा जीव घुसमटला असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान ल वकरात लवकर त्यावर तोडगा काढावा अशी मागणी प्रवासी व रहिवाशांनी केली आहे.
घोडबंदर रोड वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा समजला जातो. या मार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे. त्यातच सेवा रस्ते मुख्य मार्गाला जोडले जात असून सिमेंट, खडी, माती, सळया असे साहित्य रस्त्यावर दिसत आहे. या कामांमुळे रोज ठाणेकरांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते. गर्दीच्या वेळी सकाळी व संध्याकाळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. एकीकडे ही सर्व कामे सुरू असतानाच दुसरीकडे धुळीमुळे वाहनचालकांना समोरचे दिसणे कठीण झाले आहे. त्यामुळे आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत.
स्प्रिंकलर गाड्या, फॉग मशीन धूळ खात पडून
मीरा-भाईंदर महापालिकेने लाखो रुपये खर्च करून फवारणीसाठी आवश्यक असलेल्या स्प्रिंकलर गाड्या व फॉग मशीन विकत घेतल्या, पण या गाड्याच सध्या धूळ खात पडून आहेत. पालिकेचे आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्या बंगल्यालादेखील प्रदूषणाने विळखा घातला असून त्यांच्या घराशेजारीच अनेक बांधकामे सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर धूळ उडत आहे.
- ठाणे महापालिका हद्दीत घोडबंदर रोडवर मोठमोठे खड्डे पडले असून त्यात वाहने अडकून त्याचा धुरळा उडतो. त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
- २ मीरा-भाईंदर महापालिकेने त्यांच्या हद्दीतील घोडबंदर मार्गावर पडलेले खड्डे बुजवले, पण या डागडुजीनंतर उरलेले डेब्रिज तसेच रस्त्यावर पडून आहे. त्यामुळेही मोठा धुरळा उडतो.
- रस्त्यावर धुळीचे प्रमाण एवढे वाढले आहे की घाटमार्गावर पुढील वाहनेही दिसणे कठीण होत आहे. दरम्यान धुळीच्या ठिकाणी पाण्याची फवारणी करण्याची सूचना दिल्याची माहिती शहर अभियंता दीपक खांबीत यांनी दिली.
- घोडबंदर मार्गावर रस्त्याच्या दूरवस्थेमुळे यावर्षी १४ जणांचा बळी गेला आहे. त्यातील बहुतांश मृत्यू हे खड्ड्यांमुळे झाले आहेत. धूळ आटोक्यात आणण्यासाठी त्वरित प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
























































