विधानसभा निवडणूक ऑक्टोबरमध्ये होणार !

32
girish-mahajan

सामना ऑनलाईन | नाशिक

ऑक्टोबरच्या मध्यात विधानसभेची निवडणूक होईल. त्यासाठी सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लागेल, असा अंदाज पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे व्यक्त केला. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील दिग्गजांना भाजपाची ओढ लागली असून या दोन्ही काँग्रेसला पन्नास जागाही मिळणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला.

नाशिक येथे आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर जलसंपदा मंत्री, नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ७९१ कोटींच्या प्रारूप आराखडय़ास समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीसंदर्भात ते म्हणाले की, मागच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या तारखा पाहता यावेळी आठ-पंधरा दिवस मागे-पुढे म्हणजे ऑक्टोबरच्या मध्यात विधानसभेसाठी मतदान होऊ शकते. तीस दिवस आधी म्हणजे सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लागू शकते. हा ढोबळ अंदाज आहे, अचूक नाही. अचूक माहिती मला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्पष्ट बहुमताचे सरकार आले आहे. राज्यात पाच वर्षात चांगले काम झाले आहे, यामुळे भाजपाशिवाय पर्याय नाही याची खात्री विरोधकांना झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीतील पहिल्या फळीतील दोन-पाच नेते वगळता सर्वच दिग्गजांना भाजपाची ओढ लागली आहे. आषाढीला वारकरी ज्याप्रमाणे पंढरपूरला जातात, त्याप्रमाणे राजकारणातील वारकऱ्यांची पाऊले भाजपाकडे वळत आहेत. सत्ता स्थापने दूरच, पण या दोन्ही काँग्रेसने किमान पन्नासचा आकडा पार करून दाखवावा, असे आव्हानही महाजन यांनी दिले.

आपली प्रतिक्रिया द्या