सायबर ठगांच्या टोळ्या वाढल्या असून त्यांनी देशभरात डिजिटल अरेस्टच्या नावाखाली उन्माद मांडला आहे. या खोट्या आरोपाखाली अनेक जणांना गंडा घातला जात आहे. बनावट सर्वोच्च न्यायालय, बोगस सरन्यायाधीश आणि खोटा निकाल देत एका विकासकाची तब्बल सात कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक डिजिटल अरेस्टचे प्रकरण समोर आले आहे. आग्रा येथील एका सरकारी शाळेतील शिक्षिकेला डिजिटल पद्धतीने अटक करण्यात आली. या शिक्षिकेकडे एक लाख रुपयाची मागणी करण्यात आली. शिक्षिकेने भीतीपोटी एक लाख रुपयेसुद्धा पाठविले. परंतु शिक्षिकेला हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त होत असून डिजिटल अरेस्टची भीती दाखवणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
मुलीच्या अटकेची बातमी ऐकून मालती वर्मा अस्वस्थ झाल्या. त्यांनी लगेच मुलगा दीपांशूला बोलावून घेत एक लाख रुपये बँकेतून काढून एका नंबरवर ट्रान्सफर करायला सांगितले. पैसे कोणाला पाठवायचे असे मुलाने विचारल्यानंतर मालती यांनी सत्य परिस्थिती सांगितली. मुलाने लगेचच आईला सांगितले की, हा फेक कॉल होता. मी माझ्या बहिणीशी बोललो आहे, काळजी करू नको. परंतु मालती यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तेथे त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला.
काय आहे प्रकरण
मालती वर्मा यांना 30 सप्टेंबर रोजी मोबाईलवर एक कॉल आला. फोन करणाऱ्याने पोलिसांच्या गणवेशातील छायाचित्र लावले होते. हे पाहून हा फोन कुठल्यातरी पोलीस ठाण्यातून आल्याचे वाटले. तुमच्या मुलीला पोलिसांनी सेक्स रॅकेटमध्ये पकडले आहे. तुमच्या मुलीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करायचे नसल्यास एक लाख रुपये पाठवा, असे सांगण्यात आले. एक नंबरही पाठवला. पुन्हा फोन करून 15 मिनिटांत पैसे पाठवण्याची धमकी दिली.