ऑनलाईन साप मागवणे बेतले जीवावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बीजिंग

चीनमध्ये ऑनलाईन साप मागवणे एका तरुणीच्या जीवावर बेतले आहे. सापापासून तयार होणारी वाईन (स्नेक वाईन) बनवण्यासाठी तिने झुआनझुआन या वेबसाईटवर सापाची ऑर्डर दिली होती. मंगळवारी तिला साप असलेल्या बॉक्सचे पार्सल मिळाले. बॉक्स उघडताच सापाने तिच्या हातावर दंश केला. यात तिचा जागीच मृत्यू झाला.

दुपारी तिच्या आईने बेडरुमचा दरवाजा ठोठावला असता आतून कसलाही प्रतिसाद आला नाही. यामुळे आईने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडला. त्यावेळी तरुणी मृतावस्थेत आढळली. त्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. पण सर्पदंशामुळे तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तरुणीच्या आईला सांगितले.

तरुणीला एका महिलेने स्नेक वाईन बनवण्यासाठी साप आणण्यास सांगितले होते. म्हणूनच येथील स्थानिक वेबसाईट झुआनझुआन वर तिने सापाची ऑनलाईन ऑर्डर दिली. पण ज्या बॉक्समध्ये तिला साप देण्यात आला त्याचं पॅकिंग नीट नव्हतं, यामुळेच बॉक्स उघडताच सापाने तरुणीला दंश केल्याचा आरोप तिच्या घरच्यांनी केला आहे. चीनमध्ये प्राण्यांपासून विविध पेयं बनवली जातात. यात शीतपेयांपासून मद्यांपर्यंत सर्व पेयांचा समावेश असतो. यासाठी चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर प्राण्यांची तस्करी केली जाते. सहज उपल्बध होणारे प्राणी जसे साप, विंचू, खेकडे, अजगर या प्राण्यांची येथे बेकायदा ऑनलाईन विक्री व खरेदी केली जाते. दरम्यान, या घटनेनंतर झुआनझुआन वेबसाईटवर बंदी घालण्यात आली आहे.