गीताबोध: इति प्रथमोध्याय।

arjun yogeshwar Bhagavad Gita

>> गुरुनाथ तेंडुलकर ([email protected])

जानेवारी 2024 पासून सुरु केलेल्या या लेखमालिकेतील आजवरच्या लेखांतून आपण भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायात नेमकं काय काय घडलं हे जाणून घेतलं.

दुर्योधनाने युधिष्ठिराला द्यूताचं आमंत्रण देऊन, शकुनीच्या सहाय्याने कपट-कारस्थान करून पांडवांचं राज्य जिंकलं. त्यांना राज्याबाहेर हाकलून दिलं. एक दोन नव्हे तर तब्बल बारा वर्षं वनवास आणि एक वर्ष अज्ञातवासाची शिक्षा भोगून परतल्यानंतर पांडवांनी आपल्या वाटणीचं अर्धं राज्य दुर्योधनाकडे मागितलं. दुर्योधनाने ‘अर्ध राज्य तर सोडाच. पण सुईच्या अग्रावर राहील एवढी भूमीदेखील तुम्हाला मिळणार नाही.‘ असे दर्पयुक्त उद्गार काढून पांडवांची मागणी सपशेल धुडकावून लावली. त्यानंतरही भगवान श्रीकृष्णाने शिष्टाई करून दोन्ही पक्षांत न्यायपूर्ण समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. पण मदोन्मत्त दुर्योधनाने आणि त्याच्या भावांनी तो सपशेल हाणून पाडला. भीष्माचार्यांनी देखील युद्ध टळावं म्हणून आपल्या परीने समजावलं. पण कौरवांतली ती चांडाळ चौकडी कुणाचंच ऐकायाला तयार नव्हती. आपण अनेकदा ‘चांडाळ चौकडी‘ हा शब्द वापरतो. महाभारत कालातील चांडाळ चौकडी म्हणजे दुर्योधन, दुःशासन, शकुनी आणि कर्ण हे चौघेजण. संस्कृत सुभाषितात श्लोक आहे.

यौवनं धनसंपत्ती प्रभुत्वं अविवेकता ।
एकेकम् अपि अनर्थाय किम यत्र चतुष्टकम् ।।

भावार्थ : तरुण देहातील रग, अमर्याद धनसंपत्ती, अनिर्बंध सत्ता आणि अविवेकी स्वभाव ह्यापैकी एक एक घटक देखील अनर्थाला कारणीभूत ठरू शकतो. तर जिथे हे चारही घटक एकत्र आले तर काय होईल… केवळ कल्पनाच करा.
दुर्योधनाकडे हे चारही घटक होते. देहात रग होती. अमर्याद संपत्ती होती. निरांकुश अनिर्बंध सत्ता होती आणि स्वभाव तर सुरुवातीपासूनच अविवेकी होता. मी म्हणेन तेच आणि तसंच झालं पाहिजे ही वृत्ती अंगात भिनली होती. आणि… त्याच्या जोडीला शकुनीसारखा कपटी कूटनीतीचा अर्क असणारा सल्लागार होता. दुःशासनासारखा बलाढय़ भाऊ होता आणि जीवाला जीव देणारा कर्णासारखा शूरवीर धनुर्धर मित्र होता. दुर्योधन उन्मत्त झाला तर त्यात काही नवल नव्हतं. त्याची ही उद्दाम उन्मत्त वृत्ती त्याला सांगून-समजावून संपणार नव्हती. ही वृत्ती संपवण्यासाठी त्यालाच संपवणं आवश्यक होतं. म्हणूनच भयानक संहार समोर दिसत असूनही श्रीकृष्णाने युद्धाचा मार्ग अनुसरला. अखेर साम-दाम-दंड-भेद या न्यायशास्त्रानुसार पांडवांना युद्धाची घोषणा करणंाढमप्राप्त झालं. अनेक राजे-महाराजे-रथी-महारथी यासाठी जमले. एक पक्ष होता पांडवांचा… धर्माचा… न्यायाचा… नीतीचा… आणि दुसरा होता कौरवांचा… अधर्माचा… अन्यायाचा… अनीतीचा… भगवंतांनी ‘मी युद्धात प्रत्यक्ष सहभागी होणार नाही. हातात शस्त्र धरणार नाही.‘ असं सुरुवातीलाच सांगून टाकल्यामुळे दुर्योधनाच्या दृष्टीने भगवान श्रीकृष्णाचा काहीच उपयोग नव्हता. त्याने श्रीकृष्णाच्या सैन्याची मागणी केली.
अर्जुनाने श्रीकृष्णालाच आपल्यासोबत घेतला… सोन्याच्या द्वारकेचा अधिपती असणारा योगेश्वर श्रीकृष्ण केवळ भक्तावरील स्नेहापोटी अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करायला तयार झाला.

युद्धाची तयारी सुरु झाली. दिवस ठरला. धर्मयुद्ध असल्यामुळे युद्धाचे आखीव रेखीव नियम ठरलेले होते. त्यानुसार युद्धाच्या दिवशी दोन्ही सैन्य एकमेकांसमोर उभी राहिली. शंख फुंकले. रणवाद्यं वाजू लागली आणि अचानक अर्जुनाने समोरच्या सैन्यातील आप्तइष्ट पाहून युद्ध करण्यास नकार दिला. त्याची ही अवस्था कशी आणि कशामुळे झाली हे आपण या लेखमालेतील आधीच्या अकरा लेखातून पाहिलं. पहिल्या अध्यायातील सत्तेचाळीस श्लोकांपैकी सेहेचाळीस श्लोक आपण समजून घेतले… ऐन वेळेला युद्धातून माघार घेणाऱया अर्जुनाची मनोवस्था जाणून घेतली. अर्जुनाने वेगवेगळ्या प्रकारे ‘आपली युद्ध न करण्यामागची भूमिका‘ श्रीकृष्णासमोर मांडण्याचा प्रयत्न करत राहिला. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला एकही प्रश्न न विचारता किंवा त्याच्या बोलण्याचं खंडन न करता कुशल मानसोपचार तज्ञाप्रमाणे त्याला हवं ते बोलू दिलं. त्याचं सगळं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं. अर्जुन श्रीकृष्णाला समजावत होता. खरं तर तो स्वतच स्वतची समजूत घालत होता… श्रीकृष्ण मात्र निर्विकारपणे ऐकत होते. आपण बोलतोय. समोरचा फक्त ऐकतोय. भगवान श्रीकृष्ण काहीच बोलत नाही की कोणतीच प्रतिािढयादेखील देत नाही असं पाहून अर्जुन एकाएकी गप्प झाला… आणि…

संजय उवाच

एवम् उक्त्वा अर्जुन संख्ये रथोपस्थ उपाविशत् ।
विसृज्य सशरं चापं शोकसंविग्न मानस ।। 47।।

भावार्थ : एवढं बोलून रणांगणामधे अर्जुनाने हातातील धनुष्यबाण विसर्जित केले. तो शोकाकुल आणि उद्विग्न अवस्थेत रथाच्या मागच्या भागात जाऊन बसला. वास्तविक रथातून युद्ध करताना योद्ध्याने उभं राहून युद्ध करण्याचा प्रघात आहे. पण इथे तर अर्जुन हातातील आयुधं टाकून रथात चक्क बसला. अर्जुनाच्या या कृतीचं वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊली एक सुंदर ओवी सांगतात.

जैसा राजकुमरु पदच्युतु ,सर्वथा होय उपहतु ।
कां रवि राहुग्रस्तु , प्रभाहीनु ।।
जसा एखादा राजकुमार पदच्युत होऊन कळाहीन व्हावा किंवा ग्रहण लागलेला सूर्य निस्तेज व्हावा तशी अर्जुनाची अवस्था झाली होती. रघुनाथ पंडितांनी समश्लोकी लिहिलं आहे

बोलोनि अर्जुन असा, रथी तो बैसला उगा ।
बाणेंसी धनु टाकूनी, शोकें विव्हळमानस ।।

इथे ‘विव्हळमानस‘ हा शब्द अत्यंत चपखल आणि समर्पकपणे वापरला आहे. द्विधा मनस्थितीत सापडलेल्या अर्जुनाची मनोवस्था ‘विव्हळमानस’ या एकाच शब्दातून प्रकट झाली आहे. इथे पहिला अध्याय संपला. या अध्यायाचं नाव आहे ‘अर्जुनविषाद योग.’

या विषादातून पुढे काय होतं…?

किंकर्तव्यमूढ झालेल्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण कौशल्याने कसा योग्य मार्गावर आणतात. त्यासाठी भगवान काय काय करतात हे आपण पुढे पाहू. अर्जुनाच्या निमित्ताने भगवंतांनी आपल्या सर्वांनाच कोणत्या परिस्थितीत कोणता मार्ग योग्य असतो आणि तो कसा अनुसरावा हे सांगितलं आहे. मोठे निर्णय घेताना मन आणि बुद्धी यांतील द्वंद्व कसं सोडवावं, हे नेटकेपणाने सांगितलं आहे. आपलं नित्य आणि नियमित कर्म करत असताना कसं वागावं याविषयी मार्गदर्शन केलं आहे. म्हणूनच लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगातील त्यांच्या फावल्या वेळेचा सदुपयोग करून भगवद्गीतेवर जो ग्रंथ निर्माण केला त्याचं नाव आहे “श्रीमद्भगवद्गीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र.” हे शास्त्र आपण पुढील अध्यायांतून टप्प्याटप्प्याने जाणून घेणार आहोत.

।। श्री कृष्णार्पणमस्तु ।।