
टाइम मासिकाने पहिल्यांदा लहान मुलांच्या पुरस्काराची घोषणा केली. हिंदुस्थानी वंशाची अमेरिकेची नागरिक गीतांजली राव या 15 वर्षांच्या मुलीला टाइमच्या मासिकाचा पहिला ’किड ऑफ द इयर’ पुरस्कार जाहीर झाला आहे. उदयोन्मुख संशोधक असलेल्या गीतांजलीची निवड विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱया सुमारे पाच हजार मुलांमधून झाली आहे.
गीतांजलीने याआधी सायबर बुलिंगच्या त्रासापासून वाचवण्यासाठी एका अॅपची निर्मिती केली होती. सध्या पाण्याची शुद्धता तपासणारे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी तिचे संशोधन सुरू आहे. प्रसिद्ध हॉलींवूड अभिनेत्री अॅंजेलिना जोली हिने व्हिडीओ का@न्फरसिंगद्वारे गीतांजलीची मुलाखत घेतली. त्यावेळी गीतांजलीने आपल्या संशोधनांची माहिती दिली. गीतांजली म्हणाली, सायबर बुलिंग रोखण्यासाठी मी किंडली ही सेवा सुरू केलीय. हे एकप्रकारचे अॅप आणि क्रोम एक्स्टेन्शन आहे. ते सुरुवातीच्या टप्प्यावर सायबर बुलिंग पकडण्यास सक्षम असेल. गीतांजली म्हणाली, फक्त उपकरणे तयार करून लोकांच्या समस्या सोडवणे एवढाच माझा उद्देश नाही. मला इतरांनाही असे संशोधन करण्यास प्रोत्साहित करायचे आहे.
जग आज नव्या जागतिक महामारीचा सामना करत आहेत. ग्लोबल वॉर्मिंग आणि सायबरसारख्या अनेक समस्या आहेत. आपल्याला तंत्रज्ञानाच्या आधारे त्यावर उपाययोजना शोधायच्या आहेत. प्रत्येक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू नका, तर तुम्हाला त्रास देणाऱया समस्यांकडे लक्ष द्या. मी हे करू शकत असल्यास कोणीही ते करू शकते, हे लक्षात घ्या.
गीतांजली राव, युवा संशोधक