IPL 2026 – आम्हाला फक्त 0.5 टक्के द्या; आरसीबीची 16,660 कोटींची डील अन् नेदरलँड्सच्या खेळाडूचे भन्नाट ट्विट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामाला 28 मार्चपासून सुरू होत आहे. गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद या संघात सलामीचा सामना खेळवला जाईल. क्रिकेटच्या या महाकुंभाला सुरुवात होण्यापूर्वी दोन मोठ्या डील झाल्या. पहिल्या हंगामाचा विजेता संघ राजस्थान रॉयल्स आणि गतविजेच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची विक्रमी किंमतीत विक्री झाली. यूनाइटेड स्पिरिट्स लिमिटेडने आरसीबीची 16,660 कोटी रुपयांना विक्री केली. यानंतर नेदरलँडचा वेगवान गोलंदाज पॉल वॅन मीकरेन याने एक ट्विट केले आणि त्याची क्रीडाविश्वात चर्चा सुरू आहे.

आरसीबीच्या विक्रीच्या रकमेपैकी केवळ 0.5 टक्के भाग जरी नेदरलँड्स क्रिकेटला मिळाला, तरी तिथे क्रिकेटची प्रगती होऊन ते आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी ताकद बनू शकतात, असे पॉल वॅन मीकरेन याने म्हटले आहे. जर त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विक्रीच्या रकमेपैकी फक्त 0.5 टक्के वाटा जरी डच क्रिकेट बोर्डाला दिला, तर आम्ही पूर्ण सदस्य देशांशी असलेली स्पर्धा कमी करू शकू आणि या खेळाला खऱ्या अर्थाने जागतिक स्वरूप देऊ शकू, असे ट्विट पॉलने केले आहे.

नेदरलँड्सने नुकत्याच झालेल्या आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 मध्ये प्रभावी कामगिरी केली होती. नेदरलँड्सने पाकिस्तानला कडवी झुंज दिली. तसेच हिंदुस्थानविरुद्धही चांगली कामगिरी केली. मात्र, चारपैकी फक्त एक सामना जिंकल्यामुळे त्यांना साखळी टप्प्यातून बाहेर पडावे लागले.

दरम्यान, विश्वचषकात असोसिएट देशांच्या चांगल्या कामगिरीनंतर खेळाडूंनी मोठ्या संघांविरुद्ध अधिक सामने खेळण्याची मागणी केली आहे. ओमानचा कर्णधार जतिंदर सिंग आणि डच कर्णधार स्कॉट एडवर्ड्स यांनीही याबाबत आयसीसीला विनंती केली आहे. केवळ मोठ्या स्पर्धांपुरते मर्यादित न ठेवता असोसिएट देशांना नियमितपणे क्रिकेट खेळण्याची संधी मिळावी, असे त्यांनी म्हटले आहे.

राजस्थानचा विक्रमी ‘रॉयल’ करार, आयपीएलमध्ये जागतिक गुंतवणूकदारांची एण्ट्री