मॅक्सवेलचा खूर्चीतोड ‘परफॉर्मन्स’, आयपीएलपूर्वी एकाच षटकात फटकावल्या 28 धावा

इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल 2021) च्या 14 व्या मोसमासाठी आता अवघे काही दिवस बाकी आहेत. अद्याप याची घोषणा झालेली नसली तरी हिंदुस्थान-इंग्लंड मालिका संपल्यानंतर काही दिवसांमध्ये या स्पर्धेला सुरुवात होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. नुकताच या स्पर्धेसाठी मिनी लिलाव पार पडला. यात 14 कोटी 25 लाखांची रक्कम मिळवणाऱ्या ग्लेन मॅक्सवेल याने स्पर्धेपूर्वी धावांची लयलूट करत विरोधी संघाला इशारा दिला आहे.

बुधवारी वेलिंग्टनमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड असा सामना रंगला. या लढतीत मॅक्सवेल याने तुफानी फलंदाजी केली. मॅक्सवेलने अवघ्या 31 चेंडूत 70 धावा फटकावल्या. या दरम्यान त्याने न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज जीमी निशम याच्या एकाच षटकात 28 धावा चोपल्या. यात त्याने 4 चौकार आणि 2 षटकार ठोकले.

याआधी न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. 6 धावांवर पहिला बळी गमावल्यानंतर कर्णधार अॅरॉन फिंच आणि जोश फिलिप यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 83 धावांची भागिदारी झाली. फिलिप 43 धावा काढून बाद झाल्यानंतर मॅक्सवेल मैदानात उतरला.

मॅक्सवेल आणि फिंच यांनी ऑस्ट्रेलियाला पुढील 6 षटकांमध्ये 64 धावा चोपून दिल्या. फिंच 69 धावांवर बाद झाल्यानंतर मॅक्सवेलने अधिक आक्रमक होत फलंदाजी केली. त्याने 5 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 70 धावा ठोकल्या. मॅक्सवेलच्या या तुफानी खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने 20 षटकांमध्ये 209 धावा केल्या.

आरसीबी खुशीत

दरम्यान, इंडियन प्रीमिअर लीगच्या 14 व्या मोसमासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मॅक्सवेलसाठी 14 कोटी 25 लाख रुपये मोजले आहेत. न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या दोन लढतीत फ्लॉप राहिलेल्या मॅक्सवेलने तिसऱ्या लढतीत आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी केल्याने आरसीबी खुशीत आहे. या दरम्यान त्याने मैदानाबाहेर भिरकावलेल्या एका षटकारानेमुळे प्रेक्षकांसाठी मांडलेली खूर्ची देखील तुटली.

आपली प्रतिक्रिया द्या