Google – Apple युजर्स सावधान! 16 अब्ज पासवर्ड्स लीक, अकाऊंट हॅक होण्याचा धोका

जगभरातील इंटरनेट युजर्स साठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सायबरसुरक्षा क्षेत्रात एक मोठा डेटा लीक झाला असून, तब्बल 16 अब्जांहून अधिक पासवर्ड्स डार्क वेबवर लीक झाले आहेत. यामध्ये गुगल, अॅपल, फेसबुक आणि टेलिग्रामसारख्या मोठ्या प्लॅटफॉर्म्सच्या युजर्सचे पासवर्ड्स समाविष्ट आहेत.

केंद्र सरकारच्या सायबर सिक्युरिटी एजन्सी CERT-IN ने (Indian Computer Emergency Response Team) यासंदर्भात एक महत्त्वाची अ‍ॅडव्हायझरी जारी केली आहे. ज्यामध्ये सर्व युजर्सला तात्काळ सावधगिरी बाळगण्याचा आणि पासवर्ड बदलण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

या लीकमुळे हॅकर्सना युजर्सचे अकाऊंट हॅक करणे, डिजिटल ओळख चोरी (आयडेंटिटी थेफ्ट) आणि बँक अकाऊंटवर हल्ला करणे शक्य होऊ शकते. CERT-IN ने याला सायबर इमर्जन्सी म्हटले असून सर्व युजर्सला तात्काळ पासवर्ड बदलण्याचे आवाहन केले आहे.

पासवर्ड तात्काळ बदला

गुगल, अॅपल, फेसबुक, टेलिग्राम आणि बँक अकाऊंटचे पासवर्ड त्वरित बदला. प्रत्येक अकाऊंटसाठी वेगळा आणि मजबूत पासवर्ड वापरा. एकच पासवर्ड अनेक ठिकाणी वापरणे टाळा.