भाजप प्रदेशाध्यक्षांनी आधी तिरंगा कसा धरायचा हे शिकावे, मग जनजागृती करावी; काँग्रेसचा टोला

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम सुरू केली आहे. मात्र भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडूनच तिरंग्याचा अपमान होत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यावर आता काँग्रेसने निशाणा साधला आहे. त्यामुळे तिरंगा जागृती करण्यापूर्वी भाजप नेत्यांनी तिरंगा कसा धरायचा हे शिकून घ्यावे असा टोला काँग्रेसचे माध्यम विभाग अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी लगावला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी काल जाहीर केलेल्या दोन दिवसीय ‘तिरंगा जागृती’ कार्यक्रमावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, अमरनाथ पणजीकर यांनी भाजपच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा केलेला अनादर दाखवणारा व्हिडिओ उघड केला. भाजपचे कार्यकर्ते आता देशाचा राष्ट्रध्वज वापरून राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न करत आहेत.

गोवा भाजपचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी कालच तिरंगा उलटा दाखवून राष्ट्रध्वजाचा अपमान केला. ‘तिरंगा जागृती’ या त्यांच्या राजकीय मिशनवर जाण्यापूर्वी राष्ट्रध्वजाचा आदर कसा करायचा याचे धडे भाजप अध्यक्षांनी घेण्याचे आवाहन अमरनाथ पणजीकर यांनी केले आहे.