गोव्यात समलैंगिकांच्या लग्नापेक्षा हत्तीवरून वाद उफाळला

913

गोव्यात दोन समलैंगिकांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. यावेळी मोठा वाद उफाळला. मात्र तो या लग्नामुळे नव्हे, तर लग्नाच्या मिरवणुकीसाठी वापरण्यात आलेल्या हत्तीवरून होता. त्यामुळे प्राणिप्रेमी आणि एलजीबीटी कार्यकर्ते भलतेच संतापले. त्यांनी लगेच राज्याच्या मुख्य वन्य जीवन वॉर्डनकडे याबाबतची तक्रार केली आहे. आता या प्रकरणाची चौकशी डेप्युटी कंझर्वेटर ऑफ फॉरेस्ट करत आहेत.

गोव्यातील एका रिसॉर्टमध्ये दोन समलैंगिकांच्या रंगलेल्या विवाह सोहळ्यात दोघेही पुरुष असलेले हे दांपत्य हत्तीवर बसले होते. वाजतगाजत आणि हत्तीवरून त्यांनी रिसॉर्टवरील लग्नमंडपात प्रवेश केला. मुक्या जंगली प्राण्यांचा वापर मनोरंजनासाठी, एखाद्या सोहळ्यासाठी किंवा मजा म्हणून करणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न प्राणिप्रेमींनी यावेळी केला आहे. समलैंगिकांसारख्या एका दुर्लक्षित समाजातील लोकांनी जंगली प्राण्यांचा अशा प्रकारे वापर केल्यामुळे समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो, असे एलजीबीटी कार्यकर्त्यांशी संबंधित हरीश अय्यर यांनी सांगितले. केवळ समलिंगी म्हणून नाही, तर दोन भिन्नलिंगी व्यक्तींच्या विवाहातही हत्तीवरून मिरवणूक चूकच होती असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.

  • मुळात वन्य जीव सुरक्षा सुधारित कायद्यानुसार कोणत्याही सोहळ्यासाठी हत्ती भाडय़ावर घेण्यावर बंदी आहे. कारण हत्ती हे कायद्याच्या शेडय़ूल-1मधील संरक्षित प्रजातींमध्ये मोडले जातात. या आधारावर सामाजिक कार्यकर्ते नोर्मा अल्वेयर्स यांनी गोव्याच्या वन विभागाचे मुख्य वन्य जीव वॉर्डन संतोषकुमार आणि पीपल फॉर ऑनिमल्सच्या अध्यक्षांना पत्र लिहून या प्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणी केली आहे.
आपली प्रतिक्रिया द्या