
राजापूरात मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीच्या दारूची विक्री सुरू असल्याने सरकारचा महसूल तर बुडतोच आहे पण त्याचबरोबर परवानाधारक परमिट रूम आणि वॉईन शॉप चालकांचे व्यवसाय डबघाईला आले आहेत. गोवा बनावटीची क्वार्टर 30 ते 40 रूपयाला मिळत असल्याने तळीरामांनी परवानाधारक दारू विक्रेत्यांकडे पाठ फिरवली आहे. ’सुमडीत’ विकून तर काही ‘कोपच्यात’ बसून गोवा बनावटीची दारू विक्री सुरू आहे. त्यामुळे राजापूर तालुक्यातील परवानाधारक बार मालकांनी स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
राजापूरातील परवानाधारक बारमालकांनी दिलेल्या निवेदनात राजापूर शहर आणि ग्रामीण भागात गोवा बनावटीच्या स्वस्त दारूची विक्री होत आहे.महाराष्ट्रात उत्पादन शुल्क विभागाने दारूच्या किंमती वाढवल्या आहेत त्यामुळे ग्राहक गोवा बनावटीची स्वस्त दारू खरेदी करत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे.राजापूर तालुक्यात बेसुमार गोवा बनावटीच्या दारूची विक्री सुरू असून त्याचा परिणाम आमच्या अधिकृत व्यवसायावर होत असल्याचा आरोप बारमालकांनी केला आहे.
शाळकरी मुले दारूच्या विळख्यात अडकण्याची भीती
काही ठिकाणी गुपचूप गोवा बनावटीच्या दारूची विक्री होते तर काही ठिकाणी बैठका मारून ग्लास ओतून गोव्याची दारू रिचवली जात आहे. 30 ते 40 रूपयांना क्वार्टर मिळत असल्याने शाळकरी आणि महाविद्यालयीन मुले या दारूच्या जाळ्यात अडकण्याची भीती व्यक्त होत आहे,
13 ऑगस्टची डेडलाइन
राजापूर तालुक्यात सुरू असलेल्या गोवा बनावटीच्या दारू विक्रीवर उत्पादन शुल्क विभागाने 13 ऑगस्ट पर्यंत कारवाई केली नाही तर आम्ही स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण छेडणार असल्याचे जयेंद्र कोठारकर,विनय गुरव,प्रशांत शिंदे,अनिकेत सक्रे यांच्यासह 19 जणांनी निवेदनाद्वारे इशारा दिला आहे.