
अंथरुणावर खिळून असलेल्यांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यासाठी 15 दिवसांनी गोवा राज्यात फिरती लसीकरण मोहीम राबविण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज केली. येत्या 10 दिवसांत 45 वयोगटावरील सर्वांना लस देण्याचे लक्ष्यही मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील पंच, नगरसेवक, जिल्हा पंचायत सदस्यांसमोर मुख्यमंत्र्यांनी ठेवले.
राज्यभरातील दोन हजार पंच, नगरसेवक आणि जिल्हा पंचायत सदस्यांशी मुख्यमंत्र्यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला.
प्रत्येक लोकप्रतिनिधीने दर दिवशी 10 जणांना लसीकरणासाठी न्यावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांना प्रोत्साहित केले. उद्यापासून इतर 37 ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू केली जातील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
गावातील स्मशानभूमीत कोविड रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास द्यावेत आणि त्यासाठी लागणारी पीपीई कीट आरोग्याधिकारी देतील असेही त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीत पंचायतमंत्री माविन गुदिन्हो हेही सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांचे शंकानिरसन केले.




























































