
सामना प्रतिनिधी, मुंबई
बकरी ईदसाठी देवनार पशुवधगृहात भरलेल्या बाजारात यंदा तब्बल 70 लाखांचा बकरा विक्रीसाठी आला आहे. त्याच्या अंगावरील काळ्या-पांढऱ्या केसात ‘अल्ला’ अशी उर्दूतील अक्षरे दिसत असल्यामुळे त्याचा भाव सगळ्यात वधारलेला आहे. येत्या बुधवारी येणाऱ्या बकरी ईदसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही देवनार पशुवधगृहात बकऱ्यांचा बाजार भरला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हे बकरे इथे विक्रीसाठी आले आहेत. 15 हजारांपासून ते थेट 70 लाखांपर्यंत या बकऱ्यांच्या किमती मालकांनी लावल्या आहेत. अंगावर चांद असलेल्या, महम्मद किंवा अल्लाह, 786 असे लिहिलेल्या बकऱ्यांना या बाजारात खूप भाव आहे.
पुण्य हवे म्हणून…
या बाजारात केवळ मुस्लिमच नाहीत तर वेगवेगळ्या जातीधर्मांचे लोक आपल्याकडील बकरे विकण्यासाठी आणतात. लोकांना आकर्षून घेण्यासाठी अशी शक्कल लढवून अवाच्यासवा किमती लावतात अशी माहिती येथील एका जाणकाराने दिली. अनेकदा हे बकरे विकलेही जात नाहीत, तर कधी कधी काही खूप श्रीमंत लोक घासाघीस करून 70 ते 80 हजारांपर्यंत रक्कम मोजून पदरात पुण्य पाडून घेतात. गेल्या वर्षी या बाजारात अशाच एका बकऱ्याला दोन कोटींचा भाव सांगण्यात येत होता.
सवादोन लाख बकरे
आतापर्यंत या बाजारात 2 लाख 10 हजार बकरे विक्रीसाठी आले आहेत. त्यापैकी 1 लाख 20 हजार बकरे विकत गेले आहेत. पुढच्या दोन दिवसांत अजून काही बकऱ्यांची आवक होणार असून हा आकडा सवादोन ते अडीच लाखांपर्यंत जाण्याची शक्यता येथील पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. कुर्बानीसाठी आणलेल्या या बकऱ्यांची पशुवधगृहातील पशुवैद्यकीयांमार्फत नियमित पाहणी केली जाते, मात्र हे सगळे बकरे खास कुर्बानीसाठी पाळलेले असल्यामुळे ते तंदुरुस्त असतात असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कुर्बानीसाठी हे आहेत निकष
बकरी ईदच्या कुर्बानीसाठी बकरा निवडायला इथे दररोज किमान लाखभर लोक देवनार पशुवधगृहात येत असतात. बकरा निवडताना काही गोष्टी खास पाहून निवड केली जाते. बकरा 1 वर्षापेक्षा लहान नसावा. त्याचा हात, पाय, शिंग मोडलेले नसावे. बकरा तंदुरुस्त असावा. त्याला कोणताही आजार असू नये.
summery- Goat adorned ‘Allah’ priced 70 lakh


























































