गोधडीने दिली आत्मसन्मानाची ऊब, कोल्हापुरातील ‘संस्कार शिदोरी’मुळे महिलांना घरबसल्या रोजगार

काळानुसार अनेक गोष्टी बदलल्या तरी आई-आजीने शिवलेल्या, त्यांच्या मायेची ऊब असलेल्या मऊशार गोधडीची सर महागडय़ा ब्लँकेट्सलादेखील नाही. याच पारंपरिक गोधडीला आधुनिक साज चढवण्याचे काम कोल्हापुरातील स्मिता खामकर यांच्या ‘संस्कार शिदोरी’ने केले आहे. महत्त्वाचे म्हणजे या उपक्रमामुळे कोरोनाच्या संकटात ग्रामीण भागातील महिला आत्मनिर्भर झाल्या असून घरबसल्या त्यांना रोजगार उपलब्ध होत आहे.

040 घरातील कर्त्या पुरुषाची नोकरी गेल्यामुळे संसाराचा गाडा हाकायचा कसा, असा प्रश्न खासकरून ग्रामीण भागातील महिलांपुढे उभा राहिला. महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घेत सामाजिक कार्यकर्त्या स्मिता खामकर यांनी या उपक्रमाला सुरुवात केली आहे. याबाबत त्या म्हणाल्या, ‘‘गेल्या वर्षभरात अनेक महिलांनी कुठेतरी नोकरी मिळेल का, अशी माझ्याकडे विचारणा केली. महिला ही कुटुंबाचा कणा आहे. तिला स्वावलंबी बनवले तर संपूर्ण कुटुंब सक्षम बनते. त्यामुळे घरबसल्या त्यांना रोजगार देण्यासाठी गोधडी बनवण्याची कल्पना सुचली.’’ पुढे त्या म्हणाल्या, ‘‘गोधडी हा आपला वस्त्र वारसा आहे. सगळ्याच घरात गोधडी बनवली जाते. परंतु पारंपरिक गोधडीला आकर्षक रंगसंगतीने स्मार्ट लूक देऊन हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचादेखील आमचा प्रयत्न आहे. अगदी महागडय़ा कार्पेटला पर्याय ठरेल अशा पद्धतीने गोधडी आम्ही तयार करतोय.’’ अल्पावधीत संस्कार शिदोरीमार्फत बनवलेल्या गोधडय़ांना राज्यभरातून मागणी आहे.

अशी तयार होते गोधडी

गोधडी तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, सुई, धागा, रंगीबेरंगी कापड आदी गोष्टी महिलांना पुरवल्या जातात. गोधडी शिवण्यासाठी महिलांना खास प्रशिक्षण दिले आहे. बाळाच्या दुपट्टय़ापासून ते हॉल, किचनमध्ये अंथरायच्या कार्पेटच्या आकाराच्या तसेच बेडवर अंथरण्यासाठी अशा वेगवेगळ्या प्रकारांत गोधडय़ा येथे तयार केल्या जातात. गोधडी शिवताना मुख्य डिझाईनचे कापड मशीनवरील शिलाईद्वारे जोडले जाते. विशिष्ट आकार तयार झाल्यावर त्यावर उभे, आडवे टाके घातले जातात. ही गोधडी अधिक कलात्मक कशी होईल याकडे लक्ष दिले जाते.

महिलांना घरबसल्या रोजगार उपलब्ध होत असल्याने त्या खूश आहेत. कोरोनामुळे जी निगेटिव्हिटी तयार झालीय ती या कामात गुंतल्याने कमी झाली आहे. महिलांमध्ये नवा जोश, नवा उत्साह आला आहे. पुढील काही महिन्यांत शंभर महिलांना कायमस्वरूपी रोजगार मिळवून देण्याचे आणि ही गोधडी घराघरात पोहचवण्याचे माझे प्रयत्न असतील.
– स्मिता खामकर, संस्थापक, संस्कार शिदोरी

आपली प्रतिक्रिया द्या