
अभिनेत्री उर्वशी रौतेला सतत या ना त्या कारणाने चर्चेत असते. सध्या ती एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. उर्वशीची 70 लाखांचे दागिने असलेली बॅग लंडनमधील एअरपोर्टवरून चोरीला गेल्याचा दावा तिने केला आहे. विम्बल्डनसाठी गेली लंडनला असताना लगेज बेल्टमधून बॅग गायब झाल्याचे उर्वशी पुढे म्हणाली. उर्वशीने तिची बॅग शोधण्याचा प्रयत्न केला पण ती कुठेही सापडली नाही.
उर्वशीच्या वतीने तिच्या टीमने एक निवेदन जारी केले आहे. “प्लॅटिनम एमिरेट्स सदस्य आणि विम्बल्डनला उपस्थित राहणारी जागतिक कलाकार म्हणून हे सांगताना मला अत्यंत दुःख होतंय की, मुंबईहून एमिरेट्सच्या फ्लाइटने दाखल झाल्यानंतर लंडन गॅटविक विमानतळावर बॅगेज बेल्टमधून आमची ख्रिश्चन डायर ब्राउन बॅग चोरीला गेली.”
आमचे बॅगेज टॅग आणि तिकिटे असूनही, बॅग थेट बेल्ट एरियामधून गायब झाली. विमानतळ सुरक्षेचा हा भंग आहे. हा फक्त हरवलेल्या बॅगचा प्रश्न नाही, तर सर्व प्रवाशांच्या जबाबदारी, सुरक्षितता आणि सन्मानाचा देखील आहे., असेही पुढे निवेदनात नमूद केले आहे.
याआधी उर्वशी रौतेलाच्या आईने तिची माजी मॅनेजर वेदिका प्रकाश शेट्टीवरही चोरीचा आरोप केला होता. मीरा रौतेला यांनी दावा केला की वेदिका 2015 ते 2017 पर्यंत उर्वशीसोबत होती आणि या काळात ती चोरी आणि फसवणुकीच्या अनेक प्रकरणांमध्ये सहभागी होती.