Mumbai News – मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 37.7 कोटींचे सोने जप्त; 25 परदेशी नागरिकांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) कथित आंतरराष्ट्रीय सोने तस्करी टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सुमारे 29.37 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेल्या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 37.73 कोटींहून अधिक आहे. याप्रकरणी 25 परदेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

लोकमत टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, केनियाहून 25 जणांचा ग्रुप हिंदुस्थानात सोन्याची तस्करी करणार असल्याची गुप्त माहिती डीआरआयला मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे डीआरआयने बुधवारी पहाटेच्या सुमारास विमान उतरल्यानंतर सापळा रचून परदेशी प्रवाशांना अडवले. प्रवाशांनी तपासणीसाठी नकार दिल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. यामुळे सीआयएसएफला पाचारण करण्यात आले.

तपासणीदरम्यान, तीन प्रवाशांच्या शूजमध्ये आणि अंगावर लपवलेले वितळलेले सोन्याचे बार आणि दागिने सापडले. तपासणी सुरू होताच काही प्रवाशांनी काळ्या टेपने गुंडाळलेली सोन्याची पाकिटे बॅगेज बेल्टजवळ फेकून दिली. तपासणीअंती 25 प्रवाशांकडून एकूण 29,373 ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले. याशिवाय, बनावट पासपोर्टवर प्रवास करणाऱ्या एका प्रवाशालाही इमिग्रेशन विभागाने ताब्यात घेतले आहे.

प्रवाशांपैकी कोणाकडेही सोन्याबाबतची वैध कागदपत्रे नव्हती, तसेच त्यांनी सीमाशुल्क अधिकाऱ्यांकडे या सोन्याचे डिक्लेरेशन केले नव्हते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या तस्करीमुळे सुमारे 13.20 कोटींहून अधिक सीमाशुल्क बुडवण्यात आले आहे. या तस्करीत आंतरराष्ट्रीय सिंडीकेटचा सहभाग असल्याचे समोर आले असून हवाला कनेक्शनचीही शक्यता असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. आरोपींवर सीमाशुल्क कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.