>>मंगेश दराडे
म्हाडाच्या मुंबईतील घरांची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात मुंबईत तब्बल 3600 घरे उभारण्याची म्हाडाची तयारी असून विविध उत्पन्न गटासाठीची ही घरे शहरासह उपनगरात असणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मुंबईतील घरांच्या किमती गगनाला भिडल्या असून घर घेणे हे सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे परवडणाऱया घरांसाठी सर्वसामान्य म्हाडाच्या लॉटरीची आतुरतेने वाट पाहतात. म्हाडाच्या इतर मंडळाच्या तुलनेत मुंबईमधील घरांना नेहमीच चांगला प्रतिसाद मिळतो. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये म्हाडाने मुंबईतील 4082 घरांसाठी लॉटरी काढली होती. यासाठी तब्बल 1 लाख 22 हजार अर्ज प्राप्त झाले होते. आता या आर्थिक वर्षात मुंबईत 3600 घरांच्या उभारणीचे म्हाडाचे नियोजन आहे. अॅण्टॉप हिल, पवई, कन्नमवार नगर, मागाठाणे, पहाडी गोरेगाव अशा विविध ठिकाणी ही घरे असणार आहेत.
राज्यात वर्षभरात 13 हजार घरांची निर्मिती
प्रत्येक मंडळाची वर्षातून किमान एकतरी लॉटरी काढण्याचा मानस म्हाडाच्या उपाध्यक्षांनी व्यक्त केला होता. त्यानुसार या आर्थिक वर्षात मुंबईसह पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती येथे सुमारे मिळून 12 ते 13 घरांची निर्मिती करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.