…तर कसोटी क्रिकेट अधिक मनोरंजक होईल – सचिन तेंडुलकर

571

एक दिवसीय आणि टी-20 क्रिकेटमुळे कसोटी क्रिकेटचे भवितव्य अंधारात असल्याचे बोलले जाते. परंतु खेळाडूंची ‘कसोटी’ पाहाणाऱ्या या प्रकाराबाबत टीम इंडियाचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकर याने मोठे विधान केले आहे. कसोटी क्रिकेट चांगल्या खेळपट्टीवर खेळले गेले तर ते अधिक मनोरंजक होईल, असे सचिन म्हणाला आहे. ‘मुंबई हाफ मॅरेथॉन’दरम्यान तो बोलत होता.

पाच दिवसांच्या या खेळामध्ये खेळपट्टी महत्त्वाची असते, असे बोलताना सचिनने गेल्या आठवड्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात अॅशेस कसोटी मालिकेदरम्यान लॉर्डसवर झालेल्या कसोटी सामन्याचे उदाहरण दिले. लॉर्डसच्या खेळपट्टीवर स्टीव्ह स्मिथ आणि जोफ्रा आर्चर यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली. त्याचमुळे कसोटी क्रिकेटसाठी खेळपट्टी महत्त्वाची असते. चांगल्या खेळपट्ट्या दिल्यास कसोटी क्रिकेट निरस होणार नाही. यामुळे सामन्यात अनेक रोमांचक क्षण येतील, गोलंदाजांचे स्पेलही रोमांचक असतील, चांगली फलंदाजीही पाहायला मिळेल आणि हे पाहायला लोकही येतील, असेही सचिन म्हणाला.

स्टीव्ह स्मिथ आणि जोफ्रा आर्चर यांच्या जुगलबंदीबाबत बोलताना सचिने पुढे म्हणाला की, दुर्दैवाने स्मिथ जखमी झाला. हा त्यांच्यासाठी (स्मिथ आणि ऑस्ट्रेलिया) झटका असला तरी कसोटी क्रिकेटमधील रोमांचक क्षण होता. या घटनेमुळे अनेकांचे लक्ष कसोटी क्रिकेटकडे खेचले गेल्याचेही सचिन म्हणाला.

आपली प्रतिक्रिया द्या