मालगाडीची कांचनजंगा एक्प्रेसला धडक, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी

सिग्नल ओलांडून भरधाव चाललेली एक मालगाडी कांचनजंगा एक्स्प्रेसच्या मागच्या डब्यांवर भरधाव वेगात येऊन धडकल्यामुळे आज सकाळी नऊच्या सुमारास प. बंगालच्या दार्जिलिंग जिह्यात झालेल्या भीषण अपघातात किमान 15 प्रवासी मृत्युमुखी पडले असून 60 जण जखमी झाले आहेत. आगरतळाहून सेल्ढाकडे निघालेली कांचनजंगा एक्स्प्रेस न्यू जलपैगुडी स्थानकापासून 30 किमीवर असलेल्या रंगापानी स्थानकाजवळ सिग्नलला उभी असताना मालगाडी येऊन धडकल्यामुळे एक्स्प्रेसचे तीन डबे रुळांवरून घसरले आणि प्रवाशांमध्ये एकच हलकल्लोळ उडाला.

मालगाडी आणि एक्स्प्रेसच्या डब्यांच्या या धडकेमुळे अक्षरशः चिरफाळय़ा उडाल्या असून प्रवासी बसलेला काही भाग चेपला गेला आहे. या भागात अनेक प्रवासी अडकल्याची भीती असून, राज्य आणि पेंद्राच्या अनेक आपत्कालीन मदत व बचाव यंत्रणा येथे स्थानिकांच्या मदतीने या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील होत्या. जखमी आणि मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता अधिकाऱयांनी व्यक्त केली आहे.

मृतांमध्ये मालगाडीचे चालक, सहचालक आणि एक्सप्रेसच्या गार्डचा समावेश आहे. जखमींना नॉर्थ बंगाल मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश रेल्वे सुरक्षा आयुक्तांना देण्यात आले आहेत.

मृत आणि जखमींसाठी भरपाई

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव अपघातस्थळी पोहोचले असून त्यांनी मृतांच्या वारसांना 10 लाख, गंभीर जखमींना अडीच लाख आणि किरकोळ जखमींसाठी 50 हजार सानुग्रह भरपाई जाहीर केली आहे.

मोदींनी रेल्वेचा नाश केला

कांचनजंगा एक्स्प्रेस अपघातासह दोन वर्षांत झालेल्या मोठय़ा रेल्वे अपघातांना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव जबाबदार असल्याचा ठपका ठेवत विरोधी पक्षांनी वैष्णव यांचा राजीनामा मागितला आहे. काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रमोद तिवारी यांनी रेल्वेमंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रेल्वेचा नाश केला असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. केवळ काही वंदे भारत गाडय़ा सुरू करून रेल्वेची स्थिती सुधारत नाही, असे काँग्रेसचे मीडिया प्रमुख पवन खेरा यांनी म्हटले आहे.

अपघातस्थळी विदारक चित्र

धडकेमुळे एक्स्प्रेसचे दोन डबे रुळांवरून फेकले गेले आणि एक डबा तर मालगाडीच्या इंजिनमुळे वर उचलला जाऊन इंजिनच्या माथ्यावर अधांतरी लटकत होता. खराब हवामानामुळे मदतकार्यात अडथळे येत होते. या डब्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांचे सुटकेसाठी हाकारे सुरू होते आणि जखमी प्रवाशांच्या किंकाळय़ांमुळे सर्व कल्लोळात भर पडली होती. पावसाची रीपरीप, धुके यामुळे परिस्थिती आणखी विदारक झाल्याचे चित्र दिसत होते.

मालगाडी चालकाची चूक नव्हती

मालगाडी चालकाने सर्व सिग्नल तोडल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले असले तरी हे सिग्नल तोडण्यात त्याची चूक नव्हती असे समोर आले आहे. स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बिघडल्यामुळे या मालगाडी चालकाला राणीपत्र ते छत्तर हाट जंक्शन या दरम्यानचे सर्व लाल सिग्नल ओलांडण्याची लेखी परवानगी राणीपत्राच्या स्टेशन मास्तरने दिली होती. यासाठीचा TA 912 नावाचा लेखी अधिकार असलेला परवाना चालकाला या स्टेशन मास्तरने दिला होता.