ही तर सरकारची लाडका गुन्हेगार योजना, गजा मारणेकडून चंद्रकांत पाटील यांच्या सत्काराप्रकरणी रोहित पवारांची टीका

पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याने भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचा जाहीर सत्कार केला आहे. त्यामुळे सरकारने लाडका गुन्हेगार योजना आणली आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनी केली आहे. तुमचे मंत्री गुंडांना भेटतात हीच तुमची पार्टी विथ डिफरन्स आहे का असा सवालही त्यांनी विचारला.

रोहित पवार यांनी एक्सवर गजा मारणे चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यावर रोहित पवार यांनी म्हटले आहे की, मंत्र्यांनी गुन्हेगारांना सोबत घेऊन फिरणं म्हणजे या सरकारने लाडका गुन्हेगार योजना सुरू केल्याचं लक्षण आहे, परंतु विधानसभा निवडणुकीत गुन्हेगारांच्या मदतीने जिंकण्याची स्वप्न पाहणाऱ्यांनी हा महाराष्ट्र आहे हे मात्र विसरू नये. असो!

देवेंद्र फडणवीस साहेब तुमचे खासदार पोलिसांना धमक्या देतात, पत्रकारांना धक्काबुक्की करतात, मंत्री गुंडांना भेटतात यालाच पार्टी विथ डीफरन्स म्हणायचं का? आपल्या याच आदरातिथ्यामुळं गुंडाचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला असून गुन्हेगारी वाऱ्याच्या वेगाने फोफावत चाललीय. गुंडांना राजाश्रय देण्याच्या आपल्या कृत्यामुळं दहशतीखाली असलेली सामान्य जनताच आपल्याला योग्य वेळी चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.