एअरहोस्टेस आत्महत्या प्रकरणी निर्दोष मुक्तता होताच गोपाल कांडांना भाजपची ऑफर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हरयाणातील गितीका शर्मा या एअरहोस्टेसच्या आत्महत्येप्रकरणी हरियाणाचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार गोपाल गोयल कांडा यांची विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. कांडा यांच्याविरोधात सबळ पुरावे नसल्याने त्यांना निर्दोष ठरविण्यात आले आहे. जसे गोपाल कांडा निर्दोष ठरवले गेले त्याच्या काही तासानंतरच भाजपकडून त्यांना मोठी ऑफर देण्यात आली आहे. भाजपने त्यांना त्यांच्या पक्षात सामिल होण्याची ऑफर दिली आहे.

गोपाल कांडा यांनी मे 2014 मध्ये हरियाणा लोकहित पार्टीची स्थापना केली. सध्या ते सिरसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. हरयाणामध्ये कांडा यांच्या पक्षाने 2019 पासून भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपचे हरियाणामधील प्रवक्ते संजय शर्मा यांनी त्यांनी पक्षप्रवेशाची ऑफर दिली आहे.

”गोपाल कांडा हे भाजपचे एनडीएमधील सहकारी आहेत. आम्ही कायद्याचा आदर करतो आणि कायद्याने त्याचा निर्णय सुनावला आहे. मला माहीत आहे की, अपक्ष आमदार इतर कोणत्या पक्षात जाऊ शकत नाहीत. पण कांडा यांना भाजपात प्रवेश करायचा असेल तर आम्ही त्यांचे स्वागतच करू. भाजपाचे प्रवक्ते शर्मा पुढे असेही म्हणाले की, नुकत्याच झालेल्या एनडीएच्या बैठकीचे निमंत्रण कांडा यांना देण्यात आले होते. त्यांनी आपले भाऊ गोविंद कांडा यांना या बैठकीसाठी पाठवले होते.

गोपाल कांडा यांच्या ‘एमडीएलआर’ या हवाई वाहतूक कंपनीत एअर होस्टेस असणाऱ्या गीतिका शर्मा या तरुणीने ऑगस्ट 2012 रोजी आत्महत्या केली. गीतिकाने आत्महत्येपूर्वी कांडा यांनी मानसिक त्रास दिल्याचा आरोप करत तशी सुसाईड नोट लिहली होती. त्यावेळी कांडा हरियाणा सरकारमध्ये गृह राज्यमंत्री होते. पुढच्याच वर्षी गीतिका शर्मा यांच्या आईनेही आत्महत्या केली.