
मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याच्या कामात दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यानच्या कामातील उड्डाणपुलांचे काम करण्यात दिरंगाई केल्याप्रकरणी पालिकेने संबंधित पंत्राटदाराला 50 लाखांचा दंड ठोठावला आहे. शिवाय उर्वरित काम वेगाने पूर्ण करण्याचे निर्देशही अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत.
गोरेगाव-मुलुंड प्रकल्पामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी फुटणार असून नागरिकांना जलद, सुलभ व सुरक्षित वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या सर्व टप्प्यांची अंमलबजावणी ठरविलेल्या कालमर्यादेत पूर्ण करावी. उड्डाणपुलाचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या उद्देशाने आवश्यक तेवढे मनुष्यबळ व इतर यंत्रणा यांची पुमक वाढवावी आणि 31 मेपर्यंत उड्डाणपूल वाहतुकीस खुला करावा, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत. या पाहणीनंतर बांगर यांनी गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरातील जुळ्या बोगद्याच्या बांधकामाचीही पाहणी करून काम वेगाने करण्याच्या सूचना दिल्या.
…म्हणूनच ठोठावला दंड
गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पाचे काम चार टप्प्यांमध्ये होत आहे. यातील टप्पा 3 (अ) मध्ये उड्डाणपूल, एलिव्हेटेड रोटरी बांधकामाचा समावेश आहे. या प्रकल्प अंतर्गत दिंडोशी-गोरेगाव -दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यान 1.26 किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या कामाची पाहणी अतिरिक्त आयुक्त बांगर यांनी केली. यावेळी कंत्राटदाराकडून कामात दिरंगाई केल्याचे निदर्शनास आल्यामुळे दंड ठोठावण्यात आला आहे.




























































