झोपू दिले नाही म्हणून दारूच्या नशेत केली हत्या; अवघ्या तीन तासांत केली गुह्याची उकल

114

सामना ऑनलाईन । मुंबई

झोपण्यास विरोध केल्यामुळे नशेत असलेल्या तरुणाने एकाची हत्या केल्याची घटना गोरेगावच्या खडकपाडा येथे घडली. तन्वीर मोहम्मद आफताब शेख असे मृताचे नाव असून त्याच्या हत्ये प्रकरणी मोहम्मद फिरोज खानला दिंडोशी पोलिसांनी अटक केली. अवघ्या तीन तासांत पोलिसांनी या गुह्याची उकल केली.

मोहम्मद हा खडकपाडा येथे टायर पंक्चर काढण्याचे काम करतो. त्याला गांजाचे व्यसन आहे. मोहम्मद हा रात्री झोपण्याकरिता खडकपाडा येथील एका वर्कशॉपमध्ये जात असायचा. त्या वर्कशॉपमध्ये 5-6 कामगार झोपतात. बुधवारी रात्री मोहम्मद हा वर्कशॉपमध्ये झोपायला आला तेव्हा त्याला तन्वीर आणि मोहम्मद गुलामने विरोध केला. त्यानंतर नशेत असलेला मोहम्मद फिरोज हा रिक्षात जाऊन झोपला. सकाळी 7 वाजता मोहम्मद हा त्या वर्कशॉपजवळ आला तेव्हा नुकतेच तन्वीर, गुलाम हे झोपेतून उठले होते. काही कळण्याच्या आत मोहम्मद फिरोजने वर्कशॉपमधील कैची तन्वीरच्या छातीत दोन वेळेस मारून मोहम्मद फिरोज पळून गेला. त्याला दोघांनी पकडले. त्याला पकडून आणल्यावरही मोहम्मदने कैचीने तन्वीरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्या दरम्यान तन्वीर हा खाली कोसळला. त्याचा फायदा घेऊन मोहम्मद पळून गेला. गुलामने दिंडोशी पोलीस ठाणे गाठले तर एकाने तन्वीरला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती कळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले. रुग्णालयात डॉक्टरांनी तन्वीरला मृत घोषित केले. दिंडोशी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

बिहारला पळून जाण्यापूर्वीच केले गजाआड

हत्येनंतर तो पळून गेला होता. त्याच्या अटकेकरिता पोलिसांचे पथक गोरेगाव, दिंडोशी परिसरात तैनात केले. तो एकाला भेटला व त्याच्याकडून पैसे घेतले. पैसे घेऊन तो बिहारला पळून जाणार होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला गोरेगाव परिसरातून अटक केली. मोहम्मद हा गांजाचे व्यसन करतो.  गांजाचे व्यसन केल्यावर तो अनेकांशी तेथे वाद घालत असल्यामुळे मोहम्मदला तेथे झोपायला येऊ नये, असे सांगितले.

न्यायालयात हजर करणार

अतिरिक्त आयुक्त राजेश प्रधान, परिमंडळ-12चे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त ज्ञानेश्वर जवळकर, वरिष्ठ निरीक्षक राजाराम व्हनमाने, पोलीस निरीक्षक गणेश पवार, समाधान पवार, उपनिरीक्षक मच्छिंद्र जाधव, अमोल जाधव, नितीन पेटकर, गणेश फड, सहाय्यक निरीक्षक भारत दराडे यांच्या पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी तपास करून अवघ्या तीन तासांत गुह्याची उकल केली. चौकशीत त्याने गुह्याची कबुली दिली. त्याला अटक करून शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या