एफडीसी म्हणजे काय… एकाच गोळीमध्ये एकापेक्षा जास्त औषधांचे मिश्रण करून तयार केलेल्या औषधांना फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन ड्रग्स (एफडीसी) म्हणतात, जास्त औषधांचे मिश्रण असल्यामुळे या औषधांना कॉकटेल ड्रग्स असेही म्हणतात. ताप, सर्दी, ऍलर्जी, अंगदुखी, डोकेदुखी यासारख्या किरकोळ आजारांवर ही औषधे गुणकारी आहेत, असे औषध निर्माण शास्त्रात म्हटले आहे.
सरकारने 156 फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (एफडीसी) औषधांवर बंदी घातली आहे. ताप आणि सर्दीव्यतिरिक्त ही औषधे सामान्यतः वेदनाशामक, मल्टी-व्हिटॅमिन आणि प्रतिजैविक म्हणून वापरली जात होते. त्यांच्या वापरामुळे मानवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सरकारने म्हटले आहे. त्यामुळे देशभरात या औषधांचे उत्पादन, सेवन आणि वितरण यावर बंदी घालण्यात येणार आहे.
औषध तांत्रिक सल्लागार मंडळाच्या शिफारशींवरून सरकारने हा आदेश जारी केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 12 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, फार्मा कंपन्यांकडून वेदनाशामक औषधांच्या रूपात वापरण्यात येणाऱ्या एसेक्लोफेनाक 50 एमजी आणि पॅरासिटामॉल 125 एमजी कॉम्बेनशच्या टॅब्लेटवर बंदी घातली आहे. मोठ्या फार्मा कंपन्यांकडून बनवण्यात येणाऱ्या वेदनाशमन औषधांमधील हे प्रसिद्ध कॉम्बिनेशन आहे. सोबतच पॅरासिटामॉल, ट्रामाडोल, टारिन आणि कॅफिन यांच्या कॉम्बिनेशनवरही बंदी घातली आहे. याखेरीज मल्टीव्हिटॅमिनच्या काही औषधांनाही सरकारने बंदीच्या कक्षेत आणले आहे.
बंदी घातलेल्या औषधांच्या यादीमध्ये केसांच्या उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा समावेश आहे, अँटीपॅरासायटिक, स्किनकेअर, अँटी ऍलर्जीक आदी औषधांचे पर्याय बाजारात उपलब्ध असल्याचे सरकारने सांगितले. त्यांच्यावर कोणतेही बंधन राहणार नाही.