सरकारी बाबू विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात?

मंत्र्यांचे जवळून अनुभवलेले राहाणीमान, हातात खुळखुळणारा पैसा, रुबाब, पुढे-मागे कार्यकर्त्यांची फौज व पोलिसांचे संरक्षण अशा प्रभावामुळे  मंत्रालयातील सरकारी अधिकाऱ्यांनाही निवडणुका लढवण्याचे वेध लागले आहेत. काही अधिकाऱ्यांनी राजीनामा देऊन निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी  केल्याची जोरदार चर्चा मंत्रालयात सध्या सुरू आहे.

शासकीय सेवेतील काही अधिकाऱ्यांनी पूर्वीच्या काळातील अधिकाऱ्यांच्या पावलावर पाऊल टाकत राजकीय रिंगणात उडी मागण्याची तयारी केल्याचे सांगण्यात येते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व  माजी मंत्री अनिल देशमुख यांचे खासगी सचिव म्हणून काम केलेले गणेश हाके, मंत्री छगन भुजबळ यांचे विशेष कार्यकारी अधिकारी राहिलेले संदीप बेडसे आदींनी विधानसभा निवडणुकीत आपले नशीब अजमावून पाहिले होते.  देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलेले अभिमन्यू पवार सध्या लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 1995च्या  युती सरकारमध्ये महादेव शिवणकर यांचे खासगी सचिव राहिलेल्या सुबोध मोहिते यांनी राजकारणात उडी घेत थेट दिल्ली गाठली होती.

आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासगी सचिव तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी स्वीय सहाय्यक यांची नावे विधानसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून जोरदार चर्चेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासगी सचिव बालाजी खतगावकर हे नांदेड जिल्ह्यातून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे. खतगावकर हे गेली पाच वर्षं मुख्यमंत्र्यांचे  खासगी सचिव म्हणून कार्यरत असून त्यांना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे. तर देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक सुमीत वानखेडे हे वर्धा जिल्ह्यातील आर्वी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढण्यास उत्सुक असल्याचे सांगण्यात येते. निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने वानखेडे यांनी गेल्या दोन वर्षांपासून तयारी सुरू केल्याची चर्चा आहे.